पिंपरी : होळी व धूलवड साजरी करत असताना कुठलाही गैरप्रकार घडू नये, याकरिता पिंपरी-चिंचवड शहरामधील सर्व प्रमुख चौकांमध्ये पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी हुल्लडबाजांनी रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांवर पाण्याचे फुगे फेकल्यामुळे त्या युवकांना ताब्यात घेण्यात आले. धूलवड साजरी करत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांना रंगाने भरवणे, रस्त्यावर मस्ती करणे, महिलांची छेडछाड करण्याच्याही घटना घडत असतात. बऱ्याच वेळा रंग उडविण्यावरून वादही उत्पन्न होण्याची शक्यता असते. समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता परिमंडल तीनच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांतर्फे प्रमुख चौकांमध्ये, मुख्य रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी गुरुवारी सकाळपासूनच पोलीस तैनात करण्यात आले होते. पिंपरीतील डिलक्स चौक, आनंदनगर व भाटनगर झोपडपट्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. भोसरीतही पीएमपी चौक, नाशिक फाटा या ठिकाणी पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसह महिला पोलीस कर्मचारी तैनात होते. चापेकर चौक, वाल्हेकरवाडी या ठिकाणी पोलिसांचे पथक सकाळ पासूनच तैनात होते. (प्रतिनिधी)
हुल्ल्डबाजांना घेतलं ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2016 3:41 AM