पिंपरी : परगावी जाण्यासाठी तहसीलदारांकडून पास प्रदान केले जातील, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शेकडो नागरिकांनी पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार यांचे कार्यालय गाठले. मात्र पास देण्याबाबत शासनाकडून लेखी आदेश नसल्याचे तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला. प्रशासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्याचे या वेळी दिसून आले. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ झाला. तहसीलदार कार्यालयासमोर गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने पिंपरी-चिंचवड शहरात अडकलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एमआयडीसी व हिंजवडी-माण आयटी पार्क परिसरात लाखो नागरिक अडकले आहेत. यात परप्रांतियांसह राज्याच्या कानाकोपºयातील मजूर व कामगारांचाही समावेश आहे. देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या अशा नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रशासनाकडून पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र यात सुसूत्रता नाही. पोलीस, महसूल तसेच इतर यंत्रणांमध्ये समन्वय होऊ न शकल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने लॉकडाऊन वाढविल्यानंतर परगावी जाणाºया नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली. अर्ज भरून दिल्यानंतर तहसीलदार यांच्याकडून संबंधित नागरिकांना पास देण्यात येतील, असे सूचित करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी शनिवारी (दि. २) सकाळी नऊपासून पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार यांच्या आकुर्डी येथील कार्यालयासमोर येण्यास सुरूवात केली. परिणामी येथे नागरिकांचा वावर वाढून जमाव होऊन गर्दी होऊ लागली. नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. परगावी व परजिल्ह्यातील व्यक्तींना जाण्यासाठी पास देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश नाही. त्यामुळे नागरिकांची तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशव्दारासमोर गर्दी करू नये, अशा आशयाचा फलक तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आला. तसेच पोलीस बंदोबस्त देखील येथे तैनात करण्यात आला होता.
पिंपरी-चिंंचवडमध्ये परगावी जाण्याच्या पाससाठी शेकडो नागरिकांनी गाठले तहसील कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 8:42 PM
परगावी जाण्यासाठी तहसीलदारांकडून पास प्रदान केले जातील अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल..
ठळक मुद्देगर्दी टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह लावला सूचना फलक