जेजुरी : येथे ‘उतायन होम नीड्स’च्या नावाखाली निम्म्या किमतीवर घरगुती वापर व चैनीच्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून जेजुरीकरांना ८ ते १० लाख रुपयांना गंडा घालून तमिळनाडूचे भामटे पसार झाले. मंगळवारी दुकान न उघडल्याने हा प्रकार उघडकीस आला.जेजुरी पोलीस ठाण्यात तुषार चंद्रकांत खैर (रा. कोथळे, ता. पुरंदर) यांच्यासह आतापर्यंत १३० जणांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. तमिळनाडू येथील उत्थय्यकुमार चेलय्या (रा. कालातुन, वंडल, शिवगंगा तमिळनाडू), तसेच मनोज, रामदास आर. व्ही. व इतर दोन भामट्यांनी जेजुरीतील महालक्ष्मी चौक, मोरे गल्ली येथे मध्यवस्तीत दुकान भाड्याने घेऊन ‘उतायन होम नीड्स’ नावाने दुकान सुरू केले. आधी पैसे भरून सहा ते बारा दिवसांमध्ये अर्ध्या किमतीत कपाट, टेबल, सोफासेट, संसारोपयोगी भांडी, फर्निचर, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देण्यास सुरुवात केली.यासाठी दुकानाची रीतसर पावतीही ग्राहकांना दिली जात होती. निम्म्या किमतीत वस्तूंचा मोह पडून नागरिकांनी पटापट पैसे भरले. सुरुवातीला काही दिवस नागरिकांना वस्तू दिल्या. त्यामुळे इतरांची लालसा वाढली. नागरिकांनी रांगा लावून वस्तूंची नोंदणी केली. कोणी मुलीच्या लग्नासाठी व कोणी दुकान, घरासाठी ५० हजार रुपयांपर्यंत पैसे भरले. काहींनी दागिने मोडले, तर काहींनी जनावरे, घरातील अन्य वस्तू विकून या भामट्यांकडे पैसे भरले होते. आज सकाळी दुकान उघडले नाही, त्यामुळे काहींना शंका आली. दुकानदार राहत असणाºया मल्हार व्हीला सोसायटीतील फ्लॅटवर जाऊन चौकशी केली असता फ्लॅटलाही कुलूप होते.त्याचे सर्व मोबाइलही बंद होते. यामुळे भामटे फसवणूक करून पळाल्याची खात्री झाली. ही बातमी सगळीकडे पसरताच जेजुरीपरिसरातून अनेक जण दुकानाकडे धावत आले. या भामट्यांनी जेजुरी व परिसरातील शेकडो ग्राहकांना फसवल्याची चर्चा असून त्यांनी लाखो रुपयांना गंडा घातला असावा, अशी चर्चा आहे.>आज दिवसभर तक्रारी घेण्याचेच काम जेजुरी पोलिसांना लागले होते. रात्री उशिरापर्यंत ग्राहक येतच होते. अजूनही कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी जेजुरीपोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनीकेले आहे.
तामिळनाडूच्या भामट्यांकडून जेजुरीतील शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:41 AM