पिंपरी : ‘‘मी सीबीआय ऑफिसर बोलताेय, तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगची केस झाली आहे. या प्रकरणात अरेस्ट वॉरंट निघाले असून, ते रद्द करायचे असल्यास पैसे पाठवा, असे सांगितले. यात एका व्यक्तीकडून ४० लाख रुपये घेत फसवणूक केली. वाकड येथे २१ आणि २२ मार्च रोजी हा प्रकार घडला.
सत्यजित वीरेंद्र कुमार (४६, रा. पार्क स्ट्रीट, वाकड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ६) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी सत्यजित यांना मोबाइल क्रमांकावरून संपर्क केला. त्यांना स्काईप ॲपच्या मुंबई पोलिस ३९ आणि मुंबई सीबीआय या आयडीवर सहभागी होण्यास सांगितले. त्यानंतर संशयितांनी व्हिडिओ काॅल करून सत्यजित यांच्याशी संपर्क साधला. ‘‘मी सीबीआय ऑफिसर बोलताेय, तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगची केस झाली आहे. या प्रकरणात अरेस्ट वॉरंट निघाले असून, ते रद्द करायचे असल्यास सिक्युरिटी रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. ‘‘आम्ही आपण मनी लॉन्ड्रींगमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपास करणार आहोत. जोपर्यंत हा तपास सुरू आहे तोपर्यंत आपण नॅशनल सिक्रेट रुलनुसार कोणाशीही काहीही बोलू शकत नाही’’, असे संशयितांनी सत्यजित यांना सांगितले. त्यानंतर सत्यजित यांच्याकडून संशयितांनी ऑनलाइन पद्धतीने ४० लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली. पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.