पिंपरी : तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले असून तुमच्यावर ड्रग ट्रॅफिकिंग व मनी लाॅड्रिंगची केस झाली आहे, असे संरक्षण विभागाच्या ऑर्डनन्स फॅक्टरीतून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. त्यानंतर आठ लाख ६४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेऊन सेवा निवृत्त ज्येष्ठाची फसवणूक केली. मोशी येथे २६ मार्च रोजी ही घटना घडली.
सेवा निवृत्त झालेले पूर्णानंद वामनरावा राळेगणकर (६५, रा. मोशी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ५) भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रदीप सावंत, मिलिंद भामरे या नावाने बोलणाऱ्या अनोळखी व्यक्ती तसेच मोबाइल क्रमांकधारक व स्काइप ॲपवरील आयडीवरून चॅट करणारी व्यक्ती या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी पूर्णानंद यांना फोन करून तसेच स्काइप ॲपवरून ‘मुंबई सायबर क्राइम डिपार्टमेंट’ अशा नावाच्या आयडीवरून चॅट केले. तुमच्या फेडेक्स कंपनीच्या इंटरनॅशनल पार्सलमध्ये एमडीएमए नावाचे प्रतिबंधित ड्रग्ज सापडले आहे. तुमच्यावर ड्रग ट्रॅफिकिंग व मनी लाॅड्रिंगची केस झाली आहे, असे सांगितले.
सायबर क्राईम डिपार्टमेंटमधून मी डीसीपी बोलतोय, तुम्ही मनी लाॅड्रिंग केले नसल्याचे तपासायचे आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या खात्यावर पैसे पाठवा, असे संशयिताने सांगितले. तसेच मी पोलिस निरीक्षक बोलतोय, तुम्ही लवकर पैसे पाठवा, असे दुसऱ्या संशयिताने सांगितले. तसेच फिर्यादी पूर्णानंद यांना भिती दाखवली. त्यांच्याकडून आठ लाख ६४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेऊन त्यांची फवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक नामदेव अंगज तपास करीत आहेत.