तेजस टवलारकर -
पिंपरी : कोरोनाची लागण झालेले तरुण रुग्ण असो की, ज्येष्ठ सर्वांचा श्वास गुदमरत होता. कोविड सेंटरमध्ये पाच महिने काम केल्यानंतर आम्हालाही श्वासाची किंमत कळली, अशी भावना नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरच्या डॉक्टरांनी व्यक्त केली. कोविड सेंटर शुक्रवारी बंद करण्यात आले. त्यानिमित्त 'लोकमत'ने त्यांच्याशी संवाद साधला. पाच महिन्यांपासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. कोविड सेंटरमधील आजचा शेवटचा दिवस होता.
कोविड सेंटरच्या मुख्य व्यवस्थापक डॉ. प्रीती व्हिक्टर म्हणाल्या, वैद्यकीय सेवेत काम करीत असलो तरी, शारीरिक स्वास्थ उत्तम राखणे किती गरजचे आहे. दैनंदिन आयुष्यात व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे किती आवश्यक आहे, हे कोरोनाच्या काळात कळले. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे, असे रुग्ण कोरोनातून लवकर बरे झाले. त्यामुळे व्यायामाचे महत्त्व पटले. यामुळेच कोविड सेंटरमध्ये व्यायाम करणे सुरू केले. रुग्णांना सकारात्मक पुस्तके वाचायला दिली. रुग्णांना घरच्यांशी बोलायची इच्छा व्हायची अशा वेळी त्यांना व्हिडीओ कॉलद्वारे आम्ही त्यांचा संवाद करून दिला. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून कर्मचारी रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णांची प्रकृती ठीक आहे, असे सांगत होते. बरे झालेल्या रुग्णांनी चांगले अभिप्राय दिले. जास्तीत जास्त रुग्णांना बरे करता आले याचे समाधान आहे.
असाच अनुभव रुग्णांनीही व्यक्त केला. आईच्या पोटातून बाहेर आल्यावर श्वास हाच आपला पहिला सोबती असतो. आणि तोच आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातदेखील महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपण घेतो तो श्वास किती महत्त्वाचा आहे, याचे महत्त्व कोरोना झाल्यानंतर समजले. ऑक्सिजनशिवाय मनुष्यप्राणी जगूच शकत नाही. त्यामुळे व्यायाम, वेळोवेळी आरोग्य तपासणी करून शरीर तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे असल्याचे कोविड सेंटरमध्ये उपचार घेताना समजले, अशी प्रतिक्रिया रुग्णांनी व्यक्त केली.