पिंपरी : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे. चांगली कामे सुरु आहेत. चांद्रयान ३ मोहिमेमुळे जगाच्या पाठीवर आपले कौतुक होत आहे. मी त्या दिवशी चांद्रयान ३ बद्दल बोलत असताना चुकून माझा शब्द चंद्रकांत गेला. त्यानंतर माझ्या मित्रांनी खिल्ली उडवली.. यावेळी अजित पवारांनी हाहाहा... असं करत हसून दाखवले. तसेच त्यांनी त्या वक्तव्यबद्दल जाहीर माफी मागितली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी (दि.२५) पिंपरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी 'चांद्रयान ३'च्या यशस्वी लँडिंगबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक केले. तसेच त्यांनी त्या दिवशी झालेल्या चुकीबद्दल खुलासा केला. या मोहिमेमुळे भारत जगातल्या मोठ्या देशांच्या रांगेत जावून बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'नो कमेंट्स' म्हणत राजकीय प्रश्नांना बगल...अजित पवार आमचेच नेते आहेत असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, नो कमेंट्स, फक्त विकासाचे बोला. सर्व सामान्य लोकांना विकास हवंय. तुम्ही लोक जसे पाहता, त्या उलट मी पाहतो. मला विकासाशिवाय इतर कशावर ही भाष्य करायचं नाही. असे म्हणत त्यांनी राजकीय प्रश्नांना त्यांनी बगल दिली.
जंगी स्वागत...राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. पुष्पांची उधळण आणि सोलापूरवरून मागवण्यात आलेला भला मोठा साडेपाचशे किलोच्या पुष्पहाराने रावेत मुकाई चौकात अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. शुक्रवारी (दि.२५) दिवसभर अजित पवार हे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते.
बैठकीला कोणाला बोलवले नाहीच...मी आजच्या बैठकीला कोणाला बोलवले नव्हते, अगदी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ही बोलावले नव्हते. माझ्या प्रेमापोटी काही जण आले आहेत. मी माझ्या पक्षातील लोकांना बोलवले नाही तर भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावयचा विषय येत नाही. काम करत असताना अनेक जण बातम्या पसरवत असतात. मुख्यमंत्र्यांच काम अजित पवार करत असल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. परंतु आम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन काम करत आहे. आमचे सरकार मजबूत आहे. २०० पेक्षा जास्त आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे.