लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : गेल्या ३० वर्षांपासून पिंपरीत वास्तव्य आहे. सामाजिक उपक्रमांत नेहमीच सक्रिय राहिलो. महापालिका निवडणुकीत नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला. केलेल्या कामाची पावती मिळाली. पत्नीला नगरसेवकपदी संधी मिळाली. परंतु निवडणुकीत काहीजण दुखावले गेले. प्रतिस्पर्धी कट्टर विरोधक बनले. कोणीतरी तक्रार देऊन प्रशासनाकडे कारवाईचा आग्रह धरला. त्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाईत आमचे बांधकाम पाडण्यात आले. निवडणूक लढलो ही चूक झाली, अशी उद्विग्न भावना एका नगरसेविकेच्या पतीने व्यक्त केली आहे.संत तुकारामनगर येथील एकाने सोशल मीडियावर मनातील भावनांना शब्दरूपाने वाट मोकळी करून दिली आहे. फेसबुकवर त्यांनी कमेंट पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वर्षानुवर्षे कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना, काही अडचण आली नाही.पण निवडणूक लढल्यानंतर मात्र संकट ओढवले, ही वस्तुस्थिती त्यांनी विशद केली आहे.फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. त्या वेळी जनतेसाठी केलेल्या कामाची पावती काय मिळते, हे तपासण्याची हीच वेळ आहे; शिवाय संधी दवडून चालणार नाही, असा विचार करून महापालिकेची निवडणूक लढली. त्यात यश मिळाले. परंतु निवडणुकीला वर्ष होण्याआधीच राहत्या घरावर अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारवाईचा हातोडा पडला. डोळ्यासमोर घराचे बांधकाम पाडण्यात आले. होत असलेले सर्व काही सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. निवडणूक लढल्यामुळे ज्यांना अडचण झाली. त्यांनी अनधिकृत बांधकामाची तक्रार दिल्याने काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले.नको ते नगरसेवक पद...कार्यकर्ता म्हणून प्रभागात काम करीत राहिलो, त्या वेळी कोणी विरोधक नव्हते. काम करीत असताना, सर्वांचे सहकार्य मिळत गेले. निवडणूक लढली. त्यानंतर सर्व परिस्थितीच बदलून गेली. ज्या ठिकाणी वास्तव्य केले, त्या ठिकाणी ३० वर्षांत कधीही न आलेले संकट ओढवले. केवळ निवडणूक लढली याच कारणाने संकट ओढवले. निवडणूक लढल्याचा पश्चात्ताप व्यक्त करीत ‘नको ते नगरसेवकपद, कार्यकर्ता राहिलेलेच बरे’ अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक लढलो हीच चूक झाली वाटतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 3:19 AM