पिंपरी : शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बेसिक पोलिसिंगची आवश्यकता आहे. कोणत्याही नवीन प्रयोगाची आवश्यकता नाही. त्यासाठी आधी मी काम करणार त्यानंतर लोकं त्यावर प्रतिक्रिया देतील, असे मत नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पोलीस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे यांनी गेल्या आठवड्यात पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी शहरातील पोलीस ठाण्यांना भेट देत आढावा घेतला. तसेच शहराची माहिती होण्यासाठी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाहणीही केली जात आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी, समस्या समजून घेण्यासाठी आयुक्त शिंदे थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहेत.
याबाबत ते म्हणाले, आयुक्तालयांतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या ९० ते ९५ टक्के असते. त्यांनी नियमानुसार काम केले तर गुन्हे नियंत्रणात येण्यास आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात मोठी मदत होते. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल उंचालवले जात आहे. मी हे करणार, मी ते करणार, असे मी सांगणार नाही. मला आधी काम करायचे आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पोलीस ठाण्यांना भेटी देत आहे. कायदा, नियमावली व सूचनांची अंमलबजावणी केली तरी कायदा व सुव्यवस्था राखता येईल.
फोटो, पुष्पगुच्छांना नकार
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना सोमवारी भेटण्यासाठी आलेल्या काही नागरिकांनी पुष्पगुच्छ आणले होते. मात्र, आयुक्त शिंदे यांनी पुष्पगुच्छ स्वीकारले नाहीत. तसेच आयुक्तांसोबत फोटो काढण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही केवळ शुभेच्छा देऊन परतावे लागले.
जेष्ठांसाठी वायरलेसवरून सूचना
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोमवारी सकाळी वायरलेसवरून सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना केली. पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या, ज्येष्ठ नागरिक संघ यांची माहिती घ्या, बैठक घेऊन ज्येष्ठांच्या समस्या, अडचणी जाणून घ्या, एकटे असलेल्या ज्येष्ठांना मदत उपलब्ध करून द्या, तसेच एटीएम, बॅंकेत ज्येष्ठांची फसवणूक होते. त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करा. त्यांची फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना आयुक्त शिंदे यांनी वायरलेसवरून दिल्या.