पिंपरी : देहूरोडजवळील मामुर्डी येथील मे. दीपक आइस फॅक्टरीमध्ये ७१ हजार २१३ युनिट्सची वीजचोरी उघडकीस आली आहे. त्याची किंमत १० लाख ४८ हजार ३५० रुपये आहे. या प्रकरणी रास्ता पेठ, पुणे येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरातील भोसरी विभागातील वीजचोरीचा हा दुसरा प्रकार आहे. याबाबत माहिती अशी, भोसरी वीज विभागांतर्गत मामुर्डी येथे प्लॉट क्रमांक ३७१मध्ये दीपक आइस फॅक्टरी आहे. ती वीजग्राहक शिरीष हिराचंद शाह यांच्या मालकीची आहे. या कारखान्यातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यात वीजमीटरच्या संचातील सिटी ही वीजयंत्रणा परस्पर व वीजचोरीच्या हेतूने बदलल्याचे दिसून आले. तसेच या ठिकाणची जुनी व फेरफार केलेली सिटी यंत्रणा गायब केल्याचे आढळून आले. फॅक्टरीमधील वीजमीटर व सिटी यंत्रणा पंचनामा करून जप्त करण्यात आले आहे. सदर कारखान्यात ७१ हजार २३१ युनिट्सच्या १० लाख ४८ हजार ३५० रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. (प्रतिनिधी)
आइस फॅक्टरीने केली १० लाखांची वीजचोरी
By admin | Published: October 18, 2015 2:59 AM