पिंपरी : महापालिका निवडणुकांचा ज्वर सध्या टिपेला पोचला आहे. अवघे आठ दिवसच हातामध्ये राहिलेले असल्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची लगबग सुरू आहे. पदयात्रा, कोपरा सभा आणि थेट भेटीगाठींसोबतच उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीने वापर केला आहे. सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि संकेतस्थळांद्वारेही प्रचाराची धूम सुरू आहे. सोशल मीडियावर प्रभागांमध्ये केलेल्या कामांची माहिती देणाऱ्या, नाट्य रूपांतर असलेल्या अगदी एक-दोन मिनिटांच्या व्हिडीओ क्लिप्सही व्हायरल करण्यात येत आहेत.पुणे महापालिकेतील सभागृहामध्ये बरीच वर्षे गाजवलेले नगरसेवक यामध्ये आघाडीवर आहेत. निवडणुकांचा आणि पर्यायाने प्रचार मोहीम राबवण्याचा तगडा अनुभव या उमेदवारांच्या गाठीशी आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर करून प्रचारात आघाडी घेण्याकडे सर्वांचाच कल आहे. त्यासाठी बऱ्याच नगरसेवकांनी तसेच उमेदवारांनी त्यांच्या प्रभागातील मतदारांचे मोबाईल क्रमांक गोळा केले आहेत. या मोबाईल क्रमांकांच्या व्हॉट्सअॅपचे ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केले आहेत. एका ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये साधारणपणे ३००च्या आसपास मोबाईल क्रमांक घेता येतात. उमेदवारांच्या निवडणूक कचेऱ्या आणि वॉर रूममधून अशा प्रकारे १0 ते ५० ब्रॉडकास्ट ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुप्सवर टाकलेला मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि मतदानाचे आवाहन एकाच वेळी ३०० लोकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.फेसबुक हे नेटसॅव्ही वर्गाचे आवडते सोशल नेटवर्क आहे. प्रचारात कितीही व्यस्त असले तरी उमेदवार रात्री न चुकता सोशल मीडियाच्या दिवसभरातील वापराचा संध्याकाळी आढावा घेताना दिसत आहेत.
‘टेक्नोसॅव्ही’ प्रचाराची धूम शिगेला
By admin | Published: February 14, 2017 2:03 AM