कामशेत : कान्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तालुक्यातील आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षिका, आदर्श अंगणवाडीसेविका, तसेच आरोग्यसेविका यांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना मावळ तालुका व तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी केले होते.(कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ मावळ तालुका शिवसेना व तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांच्या वतीने मावळ तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १०० शिक्षकांचा व मावळ तालुका शंभर टक्के कुपोषितमुक्त करणाऱ्या अंगणवाडीसेविकांचा आणि तालुक्याला पुणे जिल्ह्यातील पहिला कुपोषणमुक्त तालुक्याचा मान मिळाल्याने यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्यसेविका आणि कर्मचाऱ्यांचा व तालुक्यातील अंगणवाड्या आयएसओ प्रमाणित केल्या, अशा सर्वांचा गौरव करून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.शिक्षक हा समाज घडवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असून, भावी पिढी घडवणाऱ्या या शिक्षकांचा सन्मान व त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करणे समाजाचे काम आहे. तसेच एखाद्या शिक्षकाला पदवी मिळवणे, इच्छित ठिकाणी नोकरी करणे, तसेच इतर अनेक बाबींसाठी टेबलावर नोटांचे वजन ठेवावे लागते ही शोकांतिका आहे, असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले. सर्व शिक्षा अभियान योजना केंद्राने बंद केल्याने तालुक्यातील जुन्या शाळा इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला आहे. याशिवाय अंगणवाडीसेविकांना अनुदानाऐवजी केंद्र किवा राज्य सरकारचा कर्मचारी दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बारणे यांनी सांगितले. (वार्ताहर)
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
By admin | Published: March 22, 2017 3:09 AM