पिंपरी : उद्याजकाचे अपहरण करून त्याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास उद्योजकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. खेड तालुक्यातील शिरोली येथे गुरुवार (दि. २१) ते शनिवार (दि. २३) या कालावधीत ही घटना घडली.
चाकण येथील एका उद्योजकाने याप्रकरणी शनिवारी (दि. २३) चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आकाश विनायक भुरे (२२, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) याला अटक केली. त्याच्यासह शुभम सरोदे, अजय येलोटे, सोहेल पठाण, पन्या गोसावी आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उद्योजक हे गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास आळंदी फाटा येथून चाकण येथे घरी जात होते. त्यावेळी आरोपी रिक्षातून आले. त्यांनी फिर्यादी उद्योजकाच्या गाडीला रिक्षा आडवी लावून फिर्यादीस अडवले. त्यांच्या गाडीची चावी आणि मोबाईल फोन घेऊन त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून शिरोली येथील एका शेतात नेले. रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या कालावधीत त्यांना शेतात डांबून ठेवले.
‘तुझा मोठा व्यवसाय आहे. तुला आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील. तरच तुला सोडू नाहीतर तुझी व तुझ्या घरच्यांची गेम करू. उडवून टाकू’ असे म्हणत फिर्यादी उद्योजकाच्या पायावर शस्त्र ठेवून त्यांना धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी उद्योजकाच्या बॅगमधून जबरदस्तीने २० हजार रुपये काढून घेतले. ‘दोन दिवसात कमीत कमी १२ लाख रुपये दिले नाही तर तुला व तुझ्या घरच्यांना संपवून टाकू’ अशी धमकी देऊन फिर्यादी उद्योजकास सारा सिटी येथे दुचाकीवरून आणून सोडले. त्यानंतर वारंवार फोन करून पैशांची मागणी केली, असे फिर्यादीत नमूद आहे.