प्रशासनाने न जुमानल्यास मोशीचा प्रश्न संसदेत मांडण्याची वेळ येऊ देऊ नका; डॉ अमोल कोल्हे यांची टीका
By विश्वास मोरे | Published: December 10, 2023 09:25 PM2023-12-10T21:25:12+5:302023-12-10T21:25:35+5:30
मोशी येथील खेळाचे मैदान धनदांडग्या उद्योगपतींच्या हातात देऊन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाचा मनमानी कारभार सुरु आहे.
पिंपरी : मोशी येथील चाळीसहून अधिक सोसायटींमधील मुलांच्या खेळाचे मैदान हॉर्स रायडिंगसाठी देण्याचा घाट घातला आहे. नागरिकांच्या आंदोलनास खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पाठिंबा दिला आहे. खेळाचे मैदान येथील नागरिकांसाठीच असावे. दुसरा हॉर्स रायडिंग प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा. महापालिका प्रशासनाने न जुमानल्यास मोशीचा प्रश्न संसदेत मांडण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा कोल्हे यांनी दिला.
मोशी येथील खेळाचे मैदान धनदांडग्या उद्योगपतींच्या हातात देऊन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाचा मनमानी कारभार सुरु आहे. एकीकडे केंद्र सरकार "खेलो इंडिया" ला प्रोत्साहन देत असताना पालिका प्रशासन मात्र, त्याविरोधात भूमिका घेताना दिसत आहे. या अन्यायी निर्णयाविरोधात रुपालीताई आल्हाट, परशुराम आल्हाट व आणि स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर खासदार डॉ अमोल कोल्हे शनिवारी रात्री मोशीत धडकले. त्यांनी आयुक्तांशी सवांद साधला. पत्र पाठवून यासंबंधी स्थानिक जनतेची मागणी लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. उपोषणस्थळी भेट देऊन या लढाईत मोशीकरांसोबत असल्याचा विश्वास कोल्हे यांनी दिला.
डॉ अमोल कोल्हे म्हणाले, गेल्या तेरा दिवसापासून नागरिकांचे आंदोलन सुरु आहे. याबाबत मी नागरिकाची भेट घेतली. त्यांनी मुलांच्या खेळाचे मैदान हॉर्स रायडिंगसाठी देण्यास विरोध दर्शविला आहे. मझ, प्रशासन मनमानी का करीत आहे. जर प्रशासन मनमानी कारभार करत असेल, तर ही लढाई तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सह महाविकस आघाड़ी कायम तुमच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. मला संसदेत आवाज उठविण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही प्रशासनास सांगितले आहे. याबाबत मंगळवारी महापालिकेत बैठक होणार आहे. देशाचे पंतप्रधान एकीकडे खेलो इंडियाचा नारा देतात आणि दुसरीकडे खेळाची मैदाने मुलांना मिळत नाहीत, हे दुर्दव्य आहे. मोशीतील नागरीकांच्या हक्काचे मैदान आहे. मात्र, यात कोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत समजत नाही. या तुघलकी कारभाराविरोधात आवाज उठविणार आहे, जाब विचारणार आहे. प्रशासनाची मनमानी खपून घेतली जाणार नाही.
मोशी येथील खेळाचे मैदान हॉर्स रायडिंगसाठी देऊ नये, या मागणीसाठी चाळीसहून अधिक सोसायटींमधील नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यास शनिवारी रात्री खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी भेट दिली. पाठिंबा दिला आहे.