पिंपरी : शहरात श्वानदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्यासोबतच सर्पदंशाचेही प्रकार समोर येतात. अशावेळी संबंधित रुग्णाला शासकीय किंवा महापालिका रुग्णालयात दाखल करून उपचार घेतले जातात. मात्र मांजर, माकड, पोपट यांनी चावा घेतल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उपचार न घेता अनेकजण घरगुती उपाय करतात. असे करणे संबंधित रुग्णांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे प्राणी किंवा पक्ष्यांनी चावा घेतल्यास त्वरित योग्य उपचार घ्यावेत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
महिनाभरात १४०९ जणांना श्वानदंश
पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कुत्रे चावल्याचे प्रकारही सातत्याने घडतात. सप्टेंबर २०२२ या महिन्यात १४०९ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या.
पाच महिन्यांत ५५ जणांना सर्पदंश
पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते मे २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत सर्प दंशाच्या ५५ घटना घडल्या. सर्प दंश झालेल्या रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार केले जातात.
कासवही घेऊ शकतो चावा
कासव सापडण्याचे प्रकार शहरात उघडकीस येतात. कासव हाताळण्याबाबत अनेकांना माहिती नसते. कासवाने चावा घेतल्यास गंभीर दुखापत होऊ शकते. तसेच बोट तुटून कायमचे अपंगत्वही येऊ शकते. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पक्ष्यांच्या नखाने होते दुखापत
पोपट, कावळा, घुबड, कबुतर, पारवा यांच्या नखाने किंवा चोचीनेदेखील दुखापत होऊ शकते. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना कावळ्यांनी नखे किंवा चोच मारण्याच्या घटना सर्रास घडतात. अशावेळी संबंधितांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
वायसीएम रुग्णालयात सर्पदंशावर केलेले उपचार
वर्ष - व्यक्ती
२०१७ - ३५३
२०१८ - ३४१
२०१९ - ३१२
२०२० - ६५
२०२१ - २०६
२०२२ (मे अखेर) - ५५