पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकला, त्यानुसार मी त्यांना शब्द दिल्याप्रमाणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला ९२ जागा न मिळाल्यास राजकारणातून संन्यास घेईल अशी घोषणा खासदार संजय काकडे यांनी बुधवारी केली. वाडेश्वर कटटयाच्यावतीने महापालिका निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर श्रमपरिहासाठी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी संजय काकडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, अॅड. अभय छाजेड, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस, राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रवक्ते अंकुश काकडे, गोपाळ चिंतल, श्रीकांत शिरोळे उपस्थित होते.अंकुश काकडे यावेळी बोलताना म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीमध्ये संजय काकडे यांनी ज्यांना उमेदवारी मिळवून देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्णपणे पाळला आहे. त्यामुळे शब्दाला जागणारे काकडे अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. मात्र निकालानंतर आम्ही उदयोन्मुख राजकारण्याला मुकल्याचे दु:ख पुणेकरांना निश्चितच होईल.’’ आघाडी झाल्यामुळे काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील असा विश्वास विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.निकालानंतर आम्ही ठरवू तोच पुण्याचा महापौर होईल अशी परिस्थिती असेल असे शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी सांगितले. मनसेकडून अनपेक्षितपणे बाजी मारल्याचे दिसून येईल असे मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी स्पष्ट केले.अचूक अंदाज वर्तविणाऱ्यास ५ हजारांचे बक्षीसवाडेश्वर कटटयावर बुधवारी जमलेले राजकीय मंडळी व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महापालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज एका कागदावर लिहून दिला. या अंदाजाच्या चिठठया सिलबंद करून ठेवण्यात आल्या आहेत. गुरूवारच्या निकाल जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी या चिठठ्या उघडल्या जाणार आहेत. त्यामध्ये सर्वात जवळ जाणारा अंदाज वर्तविणाऱ्यास ५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.
भाजपाला ९२ जागा न मिळाल्यास राजकीय संन्यास : काकडे
By admin | Published: February 23, 2017 1:53 AM