"गंमत जमत केल्यास बंदोबस्त करेन..." महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकत्यांना अजित पवारांचा सज्जड दम
By विश्वास मोरे | Published: May 10, 2024 08:21 AM2024-05-10T08:21:49+5:302024-05-10T08:22:57+5:30
मी तुमचा बंदोबस्त करेल, इमाने इतवारी काम करायचे आहे, मॅच फिक्सिंग, मिलीभगत चालणार नाही, असा सज्जड दम उपमुखमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी पिंपरीत दिला...
पिंपरी : कोणत्याही भूलथापांना बळी न पडता नात्या-गोत्यांचा, जातीपातीचा विचार न करू नये. गंमत-जंमत करण्याचा प्रयत्न कुणी करेल तो खपवून घेतला जाणार नाही. मी तुमचा बंदोबस्त करेल, इमाने इतवारी काम करायचे आहे, मॅच फिक्सिंग, मिलीभगत चालणार नाही, असा सज्जड दम उपमुखमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी पिंपरीत दिला.
महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील सभेत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, मनसेचे शहर प्रमुख सचिन चिखले आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, स्मार्ट सिटी, मेट्रोच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणावर निधी दिला. मोदी हे विकासपुरुष आहेत. त्यांच्या धोरणामुळे आपली अर्थव्यवस्था चांगली झाली आहे. त्यामुळे राज्य, देशाच्या विकासासाठी त्यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. रोजगार, गुंतवणूक, उद्योजकता वाढीसाठी मोदींचे हात बळकट करण्याची गरज आहे. संविधान बदलण्याचा होणारा आरोप चुकीचा आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये संविधान दिन साजरा होत नव्हता. मात्र, तो आता होत आहे.
विरोधीपक्षाचे दाखवायचे दात आणि प्रत्यक्ष दात वेगळे आहेत. निवडणुका होणार नाहीत, संविधान संपवले जाईल, असा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागच्या वेळी परिस्थिती वेगळी होती. आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे खोट्या-नाट्या प्रचाराला थारा देऊ नये. मी सत्तेसाठी हपापलेला माणूस नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी मी महायुतीबरोबर गेलो आहे. पुण्याचा रिंग रोड, मुळशीचे पाणी दोन्ही शहरांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही पवार म्हणाले.
आणि खुलासा केला!
पिंपरीतील एका कार्यक्रमात अजित पवार यांच्या पाया माजी महापौर संजोग वाघेरे पडले होते. हे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यावर पवार म्हणाले, 'आमदार अण्णा बनसोडे यांच्या कुटुंबातील लग्न होते. त्या सोहळ्यास मी उपस्थित होतो. त्यावेळी विरोधी पक्षातील उमेदवार तिथे आले आणि मला भेटले, त्यांचे फोटो व्हायरल केले. गैरसमज पसरविला. मी एकच सांगतो, ज्यांनी आपली साथ सोडली, तो आपला नाही. त्यामुळे कोणीही गडबड गडबडून जाऊ नये.'