पिंपरी : महिला या कुटुंब, संसार उभा करण्यासाठी झटतात. व्यवसायही उत्तम करू शकतात. महिलांच्या हाती पैसे आले तर त्या पै न् पै चा सद्उपयोग करतात. नियोजन करतात. मात्र, पुरुषांच्या हाती पैसा आला, तर ते काय करतील भरवसा नाही, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. तसेच, महिलांच्या कलागुणांना वाव आणि महिलांना सक्षम करणाऱ्या इंद्रायणी थडीचा उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. भोसरीतील शिवांजली सखी मंच आणि आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून इंद्रायणी थडी महोत्सव उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते.
या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया या यशस्वी योजनेत महिलांचा वाटा ५० टक्के आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी झाली. इंद्रायणी थडीच्या माध्यमातून एक हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून सुमारे २० हजार महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. बचतगट सक्षमीकरण चळवळीच्या माध्यमातून तीन लाखांहून ५७ लाख महिलांना जोडले. मातृशक्ती या मानव संसाधनाचा समावेश विकास प्रक्रियेत केल्यास प्रगती निश्चित आहे. अर्थव्यवस्था आणि सामाजिक प्रवाहात महिलांना सहभागी करून घेतले पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उद्योगांशी जोडले पाहिजे.’’
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, दिगंबर भेगडे आणि बाबूराव पाचर्णे यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रभू श्रीराम मूर्ती भेट दिली. माजी नगरसेविका नम्रता लोंढे यांनी प्रास्ताविक केले. कालिचरण महाराज यांचे शिवतांडव स्ताेत्रपठण करण्यात आले. विजय फुगे यांनी आभार मानले.
महिला उद्योजक घडविण्यासाठी व्यासपीठ
इंद्रायणी थडी महिलांच्या कलागुणांना वाव देणारी आहे. मॉलमध्ये खरेदी न करता बचत गटांकडून नागरिकांनी उत्पादनाची खरेदी करावी. यासाठी जत्रा हे व्यासपीठ आहे. त्यामुळे महिलांमध्ये व्यावसायिक व उद्योजक होण्याचा आत्मविश्वास वाढीस लागत आहे, अशी या इंद्रायणी थडी आयोजनामागील भूमिका आमदार महेश लांडगे यांनी सांगितली.