पिंपरी : भूछत्र उगवते तसे शहरात एटीएम सेंटर सुरू केले जात आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेबाबत बँका तसेच संबंधित खासगी एजन्सी व कंपन्या उदासीन असतात. त्यामुळे एटीएम फोडून चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. एटीएम सेंटरसाठी सुरक्षारक्षक नियुक्त करून सुरक्षेच्या उपाययोजना न करणाऱ्या बँका व एजन्सीला विमा कंपन्यांनी भरपाईची रक्कम देऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम मशीन फोडून रोकड चोरून नेण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. गेल्या महिन्यात देखील काही घटना घडल्या. एटीएम मशीन तयार करणा-या कंपनीतील इंजिनियरने एटीएम मशीन फोडून पैशांसाठी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दिघी येथे झालेल्या या एटीएम चोरीप्रकरणात पोलिसांनी खासगी एजन्सीकडे चौकशी केली. या एजन्सीकडून संबंधित एटीएममध्ये रोकड भरण्यात येत होती. त्यांच्याकडील कर्मचारी, वाहनचालक, तंत्रज्ञ आदींकडे चौकशी करण्यात आली . मात्र त्यांच्याकडून ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे एटीएम मशीन तयार करणा-या कपनीकडे पोलिसांनी मोर्चा वळविला. तेथील कर्मचा-यांची माहिती संकलित केली. यात आरोपी मनोज उत्तम सूर्यवंशी (वय 30, रा. पिंपरी वाघेरे, मूळ रा. जळगाव) हा 2011 ते 2017 दरम्यान या कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करीत असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याची अधिकची माहिती घेऊन त्याचा माग काढण्यात आला. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यासाठी त्याने त्याचा साथीदार आरोपी किरण भानूदास कोलते (वय 35, रा. चिखली, मूळ रा. जळगाव) याची मदत घेतली.
बनावट चावीच्या साह्याने एटीएम मशिन उघडून आरोपी सूर्यवंशी याने रोकड चोरली. त्यानंतर एटीएमचा सीपीयू व डीजिटल लॉक देखील लंपास केले. तसेच ते एटीएम पुन्हा सहज उघडून नये म्हणून त्याच्या लॉकला आतून चिकटपट्टी लावली. आरोपी सूर्यवंशी याने 2017 मध्ये तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशाच पद्धतीने एटीएम फोडून चोरी केल्याचे समोर आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे पटली ओळखआरोपी यांनी काही दिवसांपूर्वी एटीएमची रेकी केली होती. एटीएममध्ये रोकड जास्त केव्हा असते याची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्याकडील मोबाइलचे लोकेशन तेथे दर्शवित होते. मात्र चोरी करताना त्यांनी सोबत मोबाइल ठेवले नाहीत. तसेच चोरीच्या वेळीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी सूर्यवंशी कैद झाला होता. त्याने काम केलेल्या कंपनीतील फोटो आणि फुटेजमुळे त्याची ओळख पटण्यास मदत झाली.
तांत्रिक माहिती असल्यामुळेच आरोपींना एटीएम फोडून चोरी करता आली. एटीएमवर सुरक्षेच्या उपाययोजना असत्या तर कदाचित चोरीचा प्रकार टाळता आला असता. एटीएमसाठी सुरक्षाव्यवस्था करण्याबाबत संबंधित बँका व एजन्सीला सूचना करण्यात येतील.- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड