पिंपरी :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधीलराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पिंपरीत बैठक झाली. त्यात सामूहिक राजीनामे देण्याची भूमिका शहर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.
शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करताच त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीमध्येही उमटले. शहराध्यक्ष आणि स्थानिक नेते मुंबईला रवाना झाले आहेत. तर सायंकाळी खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात माजी नगरसेवकांसह, आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी बैठक घेऊन राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, वाहतूक सेल अध्यक्ष काशिनाथ जगताप, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगताप, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, उत्तर भारतीय सेल अध्यक्ष लाल मोहम्मद चौधरी, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, शाम जगताप, तानाजी जवळकर, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, कार्याध्यक्षा सविता धुमाळ, अर्बन सेल महिला निरीक्षक लता ओव्हाळ, महिला सहकार्यध्यक्षा दिपाली देशमुख, अर्बन सेल पिंपरी विधानसभा अध्यक्षा विजया काटे उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन शरद पवार यांनी वाटचाल केली. आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना घडविले. राज्याचा विकास केला. त्यांचा परीसस्पर्श झाल्याने कार्यकर्त्यांचे सोनं झाले. त्यामुळे पक्षाला त्यांची गरज आहे. त्यांनी भूमिका मागे घ्यावी.-विलास लांडे (माजी आमदार)
अचानक घेतलेला निर्णय हा कार्यकर्त्यांना मोठा धक्का देणारा ठरला आहे. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असायला हवेत, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घ्यावा.-अजित गव्हाणे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
राजकारणात तब्बल ६३ वर्ष काम करणारे, राजकारण आणि समाजकारणाचे चालते फिरते विद्यापीठ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आमचे राजकीय क्षेत्रातील काम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय होऊ शकत नाही. निवृत्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा.-कविता आल्हाट (राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष)
पक्षाध्यक्षपदी शरद पवार यांनीच यापुढेही कार्यरत रहावे. त्यामुळे आम्हाला उर्जा मिळत राहील. त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा.’’-प्रशांत शितोळे ( शहर कार्याध्यक्ष)