प्रकाश गायकर
पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसेने एकत्र निवडणूक लढविल्यास नवीन राजकीय समीकरणाची चर्चा आहे. त्याचा फायदा दोन्ही पक्षांचे नगरसेवक वाढीसाठी होईल. अशी इच्छा दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते बोलून दाखवित आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठीकडून त्यासाठी हिरवा कंदील दाखविला जाईल का? याविषयी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आशा व चिंता वाटत आहे.
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या रविवारी (दि.२१) पुण्यातील एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येतील का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर त्यांनी साद घातल्यानंतर पाहू, असे सूचक वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सेना-मनसे एकत्र येतील का? या चर्चांनाही उधाण आले. हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर फायदाच होईल, असा सूर या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांनी आळवला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही आशा वाटू लागली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शिवसेना सातत्याने गटा-तटामध्ये लढत असल्याने पक्षाला सातत्याने सत्तेपासून वंचित राहावे लागत आहे. शहर शिवसेनेमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे यांचे वेगवेगळे गट आहेत, तर राहुल कलाटे यांचा स्वतंत्र गट आहे, तसेच राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर शहर शिवसेनेमध्ये फूट पडली. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तसेच शिवाजीराव आढळराव पाटील यांचे समर्थकही शिंदे गटाच्या बाजूने आहे. त्यामुळे शहर शिवसेना कुमकवत झाली चर्चा आहे.
दुसऱ्या क्रमांकाची खेचली मते
शहरात २०१७ मध्ये शिवसेनेेने तब्बल ११९ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी फक्त ९ जागांवर यश आले, तर मनसेने ३७ जागांवर नशीब अजमावले. मात्र, मनसेच्या अवघ्या एका नगरसेवकाला सभागृहामध्ये जाता आले. मात्र, काही जागांवर शिवसेना आणि मनसे या दोघांच्या मतांची बेरीज केली असता, ती दुसऱ्या क्रमांकांची मते ठरत होती. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १२, १३ व १९ यांचा समावेश होता. या जागांवर शिवसेना आणि मनसे दोघांची मते सुमारे सात ते आठ हजारांपर्यंत जात होती. त्यामुळे मनसे-शिवसेना एकत्र आल्यास महापालिकेतील संख्याबळ वाढविण्यात मदत होणार असल्याची चर्चा आहे.
दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंद
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर ताकद वाढेल. हे दोन्ही पक्ष एक होऊन लढले, तर महापालिका निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होईल. मात्र, याबाबत वरिष्ठ मंडळी निर्णय घेतात. ते जे निर्णय घेतील, तो आम्हाला मान्यच असेल. दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल. - सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे.
शिवसेना आणि मनसे दोघे एकत्र आले, तर नक्कीच फायदा
शिवसेना आणि मनसे दोघे एकत्र आले, तर नक्कीच फायदा होईल. याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. मात्र, स्थानिक पातळीवर काम करताना आमच्यासाठी हा निर्णय आनंदाचा असेल. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य असेल. - ॲड. सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना.
काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या एकाकी पडले आहेत. अशावेळी शिवसेना आणि मनसे दोघे एकत्र येतील का? असे पत्रकारांनी त्यांना पुण्यातील एका कार्यक्रमावेळी विचारले. त्या म्हणाल्या, समोरून त्यांना साद घालू द्या. त्यांनी साद घातली तर बघू.