योगेश्वर माडगूळकर-पिंपरी : ऑनलाइन पेमेंट फेल गेले तर संबधित अॅपच्या ग्राहक सेवा केंद्राचा नंबर इंटरनेटच्या माध्यमातून शोधत असाल, तर सावधान. त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.तुमच्या अकाऊंटमधील पैसे न कळत गायब होतील. असाच प्रकार निगडी-प्राधिकरण येथील उच्चशिक्षित महिलेच्या बाबतीत घडला आहे. त्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे फसवणूक होत असल्याची बाब उघड झाली आहे.
फसणूक झालेल्या महिलेचे ४३८ रुपयांचे ट्रांझेक्शन एका अॅपद्वारे फेल गेले होते. त्यांनी इंटरनेटद्वारे ग्राहक सेवा केंद्राचा शोध घेतला. ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक मिळाला. ट्रांझेक्शन फेल गेल्याचे संबंधित महिलेने ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीस सांगितले. संबंधिताने महिलेस पैसे दोन तास परत करतो; पण अकाऊंट नंबर डिटेल सांगण्यासाठी एक ट्रांझेक्शन फेल करावे लागेल, असे सांगितले. तसेच त्याने संबंधित खात्यावरील शिल्लक रक्कमही विचारली. महिलेने संबंधित अॅप उघडला. त्यावर ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीने सांगितलेला कोड टाकला. तो चार अंकी होता. त्याखाली त्यांने रिफंड असे लिहण्यास सांगितले. त्यानंतर कोड टाकण्यास सांगितले. टाकलेला कोड म्हणजे अकाऊंटमधील तेवढे पैसे गायब झाल्याचे त्या महिलेचे लक्षात आले. खात्यावरील चार हजार गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या महिलेने फोन चालू ठेवला. संबधित अकाऊंटवरील पैसे दुसऱ्या खात्यावर वळविले. हा नंबर बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ग्राहक प्रतिनिधीने एटीएम कार्डचे डिटेल मागितले. ते डिटेलही त्याला दिले. त्यानंतर ओटीपी विचारून दुसऱ्या खात्यातील रक्कम पळविण्याचा प्रयत्न करत होता. पण संबधित महिलेने त्याला ओटीपी सांगितला नाही. त्यामुळे संबंधिताला दुसऱ्यांदा फसवणूक करता आला नाही.
लोकप्रतिनिधी आणि बनावट ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीशी झालेला संवाद संबधित बनावट ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधीशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावेळी बनावट ग्राहक सेवा केंदातून ‘लोकमत’ प्रतिनिधीला मोबाईल नंबर विचारला. तसेच अकाऊंटचा बॅलन्स विचारला. प्रतिनिधीने फोन कट केला. त्यानंतर ग्राहक सेवा केंद्रातून पुन्हा फोन आला. पण लोकमत प्रतिनिधीने माझे पैसे परत मिळाले आहेत, असे सांगतिले. त्यानंतर त्याने फोन कट केला.
....................................
काय काळजी घ्यावी१) नेटवरून कोणत्याही अॅपचा ग्राहक क्रमांक शोधू नये.२) अॅपचे प्रतिनिधी कधीही बँकेचा अंकाऊट नंबर विचारत नाहीत. त्यामुळे हा नंबर कोणालाही सांगू नये.३) खात्यातील शिल्लक रक्कम विचारत नाहीत. तेही कोणालाही सांगू नये.४) प्रत्येक अॅपने तक्रार देण्यासाठी मदत केंद्राची सोय केली आहे. त्यावर संपर्क साधावा.५) एटीएम कार्डची माहिती कोणीही विचारत नाही. त्यामुळे त्याची माहिती देऊ नये.६) ओटीपी कोणालाही शेअर करू नये.७) अधिकृत प्रतिनिधी कधीही सेल्फी मागत नाहीत. त्यामुळे सेल्फी देऊ नये८) सेल्फी दिल्यास सोशल मीडियावर बदनामी होण्याची शक्यता आहे.
........................
निर्ढावलेले गुन्हेगारहे प्रकार झारखंड परिसरातील जमताडा परिसरातून सुरू आहेत. त्या गुन्हेगारांना आपण महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक करत आहोत, हे माहीत आहे. याठिकाणी पोलीस सहजासहजी पोहचू शकणार नाहीत. त्यामुळे हे प्रकार सुरू आहेत. तक्रार करूनही पैसे परत मिळणार नाहीत. फुकट मनस्ताप नको, म्हणून अनेक नागरिक तक्रारही करत नाहीत. अनेक वेळा सेल्फी मागवून घेतला जातो. त्याद्वारे सोशल मीडियावर बदनामी करण्याचा डाव रचले जाते.