पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अनेक कर्मचारी काम करीत होते. मात्र, मुलगा व सुनांना नोकरी नसल्याने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत लाड-पागे अंतर्गत आपली मुले व सुनांना त्यांच्या जागेवर नोकरी दिली. मात्र, पालिकेची हक्काची नोकरी मिळाल्यानंतर पोटच्या पोरांनीदेखील आई-वडिलांकडे पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
महापालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ३६७ कर्मचारी हे लाड-पागे अंतर्गत कामावर रुजू झाले आहेत. म्हणजेच आई, वडील यांच्या जागेवर त्यांचा मुलगा किंवा सून वारसनोंदीने कामावर रुजू होतात. आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी निवृत्त होण्यास काही वर्षे बाकी असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊन अशा पद्धतीने आपल्या वारसांना कामाला लावले आहे. लाड-पागे अंतर्गत वारसाला नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी ज्यांच्या जागेवर नोकरी मिळाली आहे, त्यांचा सांभाळ करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक मुले व सुनांनी नोकरी मिळाल्यानंतर त्यांच्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्याबाबत स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी सातत्याने तक्रार करीत आहेत. त्यामुळे प्रशासनानेदेखील आई-वडील व सासूचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आई, वडील व सासूचा सांभाळ न करणाऱ्या ४ कर्मचाऱ्यांना नोटीस दिली आहे. तसेच याबाबत आणखी ९ स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या नोकरीवर असलेल्या वारसांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यानेही काही फरक न पडल्यास या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
कर्मचाऱ्यांचे करणार समुपदेशन
आई, वडील तसेच सासूचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. वायसीएम रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे हे या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करणार आहेत.
सांभाळ करणार असल्याचे वारसांचे लेखी हमीपत्र
लाड-पागे अंतर्गत वारसांना कामावर रुजू करतेवेळी त्यांच्याकडून आई, वडील तसेच सुनेला काम देणार असेल तर सासू - सासरे यांचा सांभाळ करण्याचे लेखी घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा सांभाळ करणे बंधनकारक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्यथा, त्यांच्यावर कारवाई
चार कर्मचाऱ्यांना नोटीस दिली आहे. तसेच ९ जणांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचा सांभाळ करणे आवश्यक आहे; अन्यथा, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. - विठ्ठल जोशी, उपायुक्त.