पिंपरी : ढाबाचालकांना दारू विक्री करण्याची परवानगी नसते. तेथे केवळ जेवण करता येते. त्यामुळे ढाब्यावर मद्यपान करणे गुन्हा ठरतो. यात गुन्हा दाखल करून ढाबाचालकांना लाखोंचा दंड आकारण्यात येतो. ढाब्यावर दारू पिणाऱ्यांवरही कारवाई होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई केली जाते. दारू विक्री करणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करणे यासाठीचे स्वतंत्र परवाने असतात. त्या परवान्याच्या आधीन राहूनच दारूची विक्री करता येते. मात्र बाहेरून दारू आणून ढाब्यांवर पिण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ढाबाचालकही ग्राहकांना दारू उपलब्ध करून देतात.
सात महिन्यांत १०९ गुन्हे
राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागांतर्गत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील ई आणि फ तसेच तळेगाव दाभाडे विभागाकडून एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्यांच्या कालावधीत ढाब्यांवर कारवाई करून १०९ गुन्हे दाखल करण्यात आले. यात ढाबा मालक-चालक तसेच ढाब्यांवर दारू पिणाऱ्यांवरदेखील गुन्हे दाखल केले.
छुप्या पद्धतीने होते दारू विक्री
पुणे-नाशिक, पुणे-मुंबई, मुंबई -बंगळुरू महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग या मुख्य मार्गांवरून अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. यातील ट्रक, कंटेनर अशा अवजड वाहनांचे चालक ढाब्यांवर जेवणाला पसंती देतात. यातील काही चालक ढाब्यांवर मद्यपान करतात. त्यांना काही ढाब्यांवर दारूचा पुरवठा होतो. त्यासाठी ढाब्यांवर दारूची छुपी विक्री केली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाया वाढविल्या तर ढाब्यांवरील अशा छुप्या दारू विक्रीला आळा बसू शकतो.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत केलेली कारवाई-
विभाग - ढाब्यांवरील गुन्हे - एकूण गुन्हे - एकूण अटक आरोपी - जप्त वाहने - जप्त मुद्देमालाची किंमत (रुपयांमध्ये)
ई - ३५ - १३५ - ७५ - ५ - २,९६,४६००
फ - ३१ - १४५ - ११० - ९ - १४,५३,६६७
तळेगाव दाभाडे - ४३ - १५९ - २०२ - ११ - १,५१,०७,२१६
ढाब्यांची नियमित तपासणी
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ढाब्यांची नियमित तपासणी होते. दारू विक्री होत असलेल्या ढाबाचालकांवर गुन्हे दाखल केले जातात. ढाब्यांवर दारू पिणाऱ्यांवरही कारवाई होते. ढाबाचालक-मालक तसेच वाहनचालकांनी ढाब्यावर दारू विक्री किंवा पिण्याचे टाळावे.
- युवराज शिंदे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे