पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील खासदार, आमदारांनी किती निधी आणला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला होता. त्याला आकडेवारी सांगून शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. केंद्राने महापालिकेला किती निधी दिला, याबाबत आरोप करणारे अज्ञानी आहेत, अशी खिल्ली उडविली आहे.शहरविकासात खासदार-आमदारांची कोणतीही भूमिका नाही, अशी टीका राष्ट्रवादीने केली होती. या विषयी खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना विचारले असता, त्यांनी राष्ट्रवादीचे अज्ञान उघड केले. ते म्हणाले, ‘‘कोणत्या खासदाराने आपल्या मतदारसंघात किती खर्च कोठे केला, याबाबत केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. एवढीही माहिती नसणे हे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत शहरातील विविध प्रकल्प झाले. झोपडपट्टी निर्मूलन प्रकल्प, नाशिक रेल्वे, नाशिक महामार्ग चौपदरीकरण यास केंद्राकडूनच निधी आला आहे. ही बाब विरोधकांना माहिती नसावी, यापेक्षा दुर्देव काय?’’मेट्रो पिंपरीऐवजी निगडीपर्यंतच न्यावी, अशी मागणी आहे. मेट्रोबाबत महापालिकेने जो प्रस्ताव पाठविला. तो पिंपरीपर्यंतच होता. ही चूक पालिकेची आहे. अनधिकृत बांधकामे, शास्ती या प्रश्नाबाबत जनतेबरोबरच आहोत. अनधिकृत बांधकामांबाबत बारणेंना काही कळत नाही, असे भाजपातील काही लोक म्हणाले होते. त्यांनी तरी आश्वासन पूर्ण केले का, हा प्रश्न जनता विचारल्याशिवाय राहणार नाही, असे बारणे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
खासदार-आमदार निधीबाबत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे अज्ञान
By admin | Published: January 14, 2017 2:57 AM