लोणावळा : मावळ तालुक्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना पुर्णविराम देण्याचा मनोदया लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस नवनीत काँवत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यांनी नव्यानेच लोणावळा उपविभागाचा कार्यभार स्विकारला आहे. काँवत म्हणाले, माझ्या कार्यकक्षेत वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर ही चार पोलीस ठाणी येतात. पूर्वी याठिकाणी काय चालायचं मला माहिती नाही मात्र आता या भागात कोठेही अवैध धंद्यांना स्थान दिले जाणार नाही. मावळ उपविभागाची माहिती घेताना कामशेत व वडगाव पोलीस ठाणे हद्दीत तसेच हायवे लगतचे अनेक हॉटेल व धाबे येथे बनावट तसेच विना परवाना दारु विक्री केली जाते, काही ठिकाणी मटके, जुगारचे क्लब, पर्यटनस्थळांवर अंमली पदार्थ विक्री असे प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकार्यांना तातडीने हे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी देखिल आपल्या आजुबाजुला कोठेही अवैध धंदे सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ लोणावळा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणाचीही गय केली जाणार नाही. माझ्या कार्यकाळात व माझ्या कार्यकक्षेत कोठेही अवैध व्यावसाय चालणार नाहीत याचा नागरिकांनी विश्वास बाळगावा. पोली कर्मचार्यांकडून देखिल गैरवर्तन होत असल्यास खबर करावी, प्रत्येक तक्रारीची शहनिशा करुन दखल घेतली जाईल असे काँवत यांनी सांगितले. काँवत हे 2017 सालच्या बँचचे टॉपर आयपीएस अधिकारी असून लोणावळ्यात त्यांची पहिलीच पोस्टिंग आहे.
मावळ तालुक्यातील अवैध धंद्यांना पूर्णविराम देणार - नवनीत काँवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:21 PM