पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात लाखो लिटर पाण्याचा राजरोसपणे बेकायदारीत्या उपसा होत आहे. मोटारीच्या साहाय्याने टँकरमध्ये पाणी भरून पाण्याची चोरी होत असताना पवना धरण पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.पवना धरण परिसरात शहरातील विविध उद्योजक, बिल्डर, राजकीय नेते, अभिनेते यांच्या बंगल्याची व फार्म हाऊसची कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी पाण्याची सुविधा नसल्याने धरणातील पाणी वापरले जाते. मात्र, परिसरातील काही पवना पाटबंधारे विभागाचे अधिकारी कोणत्याही टँकरवर कारवाई करताना दिसत नाही. सर्रासपणे टँकरच्या साहाय्याने पाण्याची विक्री केली जात आहे. अधिकारी व टँकर मालक यांच्या संगनमताने हा उद्योग सुरू असल्याचा आरोपही होत आहे. हा सर्व प्रकार राजरोसपणे सुुरूआहे. पवना नदीवरील ब्राह्मणोली पुलाजवळ देखील पाण्याची चोरी होत आहे. अशाप्रकारे पाण्याची चोरी करून विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तरी याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून हे टँकर व पवना पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पवना धरण परिसरात पाणी नेण्यासाठी अशा कोणत्याही टँकर अथवा ट्रॅक्टरला परवानगी दिलेली नाही. दरम्यान, सध्या गावोगावी पाण्याची टंचाई असल्याने जर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करत असतील, तर ते योग्य आहे. परंतु, जर या पाण्याची विक्री होत असेल अथवा बंगले, फॉर्म हाऊस व बांधकाम करण्यासाठी नेत असतील, तर अशा टँकरवर कारवाई केली जाईल.- मनोहर खाडे, पाटबंधारे शाखा अभियंता, पवनानगर
पवनेतून पाण्याचा बेकायदा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 6:39 AM