पिंपरी : तळवडे येथे पाच दिवसांपूर्वी रामदास सोनबा कांबळे (वय ३५, रा. खंडोबामाळ, आकुर्डी) या तरुणाचा झालेला खून अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून झाल्याचे समोर आले आहे.
बाळासाहेब भाऊसाहेब सपाटे (वय ३४, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) असे या गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तळवडे येथील स्मशानभूमीजवळ सोमवारी सकाळी तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केलेला मृतदेह आढळून आला. चेहऱ्याचा चेंदामेंदा झाल्याने ओळख पटविण्यात अडचण येत होती. दुसºया दिवशी ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मात्र, खुनाचे कारण आणि आरोपी स्पष्ट होत नव्हते.दरम्यान, गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असताना कांबळे यांच्या घराशेजारी राहणाऱयांकडे चौकशी केली. तसेच मोबाइल क्रमांक तपासून चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता धागेदोरे मिळाले.
रामदास कांबळे यांची पत्नी व बाळासाहेब सपाटे यांच्यात अनैतिक संबंध होते. यामध्ये रामदास कांबळे अडसर ठरत असल्याने सपाटे याने रविवारी कांबळे यांना जास्त दारू पाजून तळवडे येथे नेले. त्याठिकाणी इंद्रायणी नदीकाठी निर्जनस्थळी डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झाले.ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम तांगडे, सुधाकर काटे, सहायक निरीक्षक दीपाली मरळे, गणेश पाटील, भिवनेश सांडभोर, संतोष बर्गे, नारायण जाधव, किशोर शेटे, किरण खेडकर यांच्या पथकाने केली.
दरम्यान शहर परिसरामध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. परंतु, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.