पिंपरी : गोवा राज्यातील विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या तस्करीवर कारवाई केली जात आहे. त्यात औषधांच्या नावाखाली अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अवैध मद्याची वाहतूक होत असलेल्या ट्रकला पकडून दोन जणांना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साइज) मुळशी तालुक्यात सोमवारी ही कारवाई केली.
दानाराम चुनाराम नेहरा, रुखमनाराम खेताराम गोदरा, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एक्साइजचे पुणे येथील अधीक्षक चरणजितसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साइजच्या सासवड विभागाच्या पथकाने मुळशी तालुक्यातील माले या गावाच्या हद्दीत पुणे-माणगाव मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली. त्यावेळी एक ट्रक थांबवला असता ट्रकचालकाच्या हालचाली संशयित वाटल्या. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी सुरू केली. ट्रकमध्ये काय असे त्याला विचारले. ट्रकमध्ये औषधे व इंजेक्शन आहेत, असे ट्रक चालकाने सांगितले. मात्र, त्याचा संशय आल्याने पथकाने ट्रकमध्ये तपासणी सुरू केली. गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले ४६ लाख ६७ हजार ५२० रुपयांचे मद्य ट्रकमध्ये मिळून आले. हे मद्य आणि ट्रक, मोबाइल असा एकूण ५७ लाख २५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
एक्साइजचे सासवड विभागाचे निरीक्षक पी. सी. शेलार, दुय्यम निरीक्षक दीपक सुपे, जवान तात्या शिंदे, रणजित चव्हाण, सुनील कुदळे, दत्तात्रय पिलावरे, भागवत राठोड, भगवान रणसुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ट्रकमध्ये इंजेक्शन नव्हे गोव्यातील मद्य
ट्रकचालकाकडे मद्य वाहतुकीसंदर्भातील कोणताही वाहतूक पास, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. औषधे व इंजेक्शनच्या नावाखाली हा मद्य साठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करून आणल्याचे तपासातून समोर आले. त्यामुळे एक्साइजच्या पथकाने गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.