पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने निगडी, देहुरोड, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर लॉटरी, जुगार, व्हिडीओ पार्लर चालवणाऱ्यांवर मंगळवारी रात्री कारवाई करत हे बेकायदेशीर धंदे उद्धवस्त केले. निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पवळे ब्रीज जवळील जयप्रकाश मार्केटमधील सचिन शंकर रोमन, विजय शंकर रोमन (दोघे साईनाथ नगर, निगडी), रितेश अशोक केशवानी (रा. यमुनानगर, निगडी), आनंद प्रसाद (रा. मोरेवस्ती, चिखली), केतन उर्फे बंटी बदाम मुसळे (रा. वाल्हेकरवाडी), या लॉटरी चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पा गुन्हे दाखल करण्यात आले असून एकुण २६ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये २६ व्हिडीओ गेम मशिन, सात एलईडी टीव्ही, रोख रक्कम, मोबाईल व इतर जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई व्हिडीओ गेम पार्लरमध्ये व्हिडीओ गेमच्या साह्याने जुगार अड्डा चालणाऱ्या व्हिडीओ गेम पार्लर चालक समीर शेख (रा. देहुगाव) गणेश खंडेलवाल यांच्यासह आणखी दोन जणांना अटक केली आहे. तसेच जय मातादी व्हिडीओ गेम पार्लर चालक हरिश विठ्ठल तिटकरे (रा. किवळे) याच्या विरोधात कारवाई करून दोन जणांना अटक करण्यात आली. या दोन्ही गुन्हांमध्ये दोन लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.तसेच वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
कारवाईत सात पोलीस निरीक्षक, ४० पोलीस अंमलदार सहभागी
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, सात पोलीस निरीक्षक, पाच पोलीस निरीक्षक यांच्यासह ४० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.