पिंपळे गुरव : नवी सांगवीतील माहेश्वरी चौकातील दुभाजकाला रिफलेक्टर, सूचनाफलक नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणांत वाढ झाली होती. रात्रीच्या वेळी भरधाव जाणाऱ्या वाहनचालकांना दुभाजक दिसून न आल्यामुळे रोजच दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होत होते. त्यामुळे येथे रिफ्लेक्टर आणि सूचनाफलक बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून येथे रिफ्लेक्टर बसविण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
वाहतुकीला शिस्त लागावी, कोंडी कमी व्हावी, वाहतूक सुरळीत व्हावी, चौकांचे सुशोभीकरण व्हावे म्हणून शहरातील बहुतांश चौकांमध्ये महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून दुभाजक बनविले. चौकांची जागा मोक्याची असल्यामुळे खासगी व्यावसायिकांची गर्दी आहे. दुभाजक आणि खासगी व्यावसायिक व बेशिस्त पार्किंग यामुळे चौकातील रस्ते अरुंद बनले आहेत. चौक सोडून प्रत्येक रस्ता रुंद आहे. मात्र ज्या ठिकाणी चौक आहे, त्या ठिकाणी रस्ते अरुंद बनले आहेत. त्यामुळे प्रमुख चौकामध्ये वाहतुक कोंडीत वाढ होत होती. या वाहतुक कोंडीत ओव्हर टेक करण्याच्या नादात अनेक दुचाकी व चारचाकी वाहने दुभाजकावर आदळून अपघात होत होते.नवीन वाहन चालकांना प्रवासात अचानक चौक माहित नसल्यामुळे अपघात होत होते. इतर वेळी भरधाव वेगाने असणारे वाहन अचानक चौक आल्यानंतर कमी वेग होत नव्हता. अचानक ब्रेक दाबल्यांमुळे वाहने एकमेकांशी आदळत होती.नवी सांगवीतील माहेश्वरी चौकामध्ये रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रिफलेक्टर व सूचनाफलकांचा अभाव असल्यामुळे अपघात होत होते. पावसामुळे दुचाकी स्लिप होण्याच्या घटना रोजच घडत आहेत. महापालिकेच्या स्थापत्य विभागाने दुभाजकाला नवीन रिफलेक्टर बसविले. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.- नथुराम ढोकळे, जेष्ठ नागरिक, नवी सांगवीसांगवी, पिंपळे गुरव परिसरातील प्रमुख चौकांची पाहणी केली. महापालिकेच्या वाहतुक विभाग व स्थापत्य विभागांना याबाबत माहिती देऊन रिफलेक्टर बसविण्यासाठी प्रयत्न केला आहे. धोकादायक आवश्यक त्या ठिकाणी रिफलेक्टर बसविले जाणार आहेत. वाहचालकांनीही आपण शहरात राहतो, याचे भान ठेवून वाहने चालवावीत, यामुळे निश्चित अपघातांचे प्रमाण कमी होईल.- नितीन जाधव, वाहतुक पोलीस निरीक्षक, सांगवीपुर्वी दुभाजकावर रिफलेक्टर बसविले होते. मात्र वाहनांच्या अपघाताने रिफलेक्टर तुटलेले व मोडकळीस आले होते. त्या ठिकाणची पाहणी करुन नवीन रिफलेक्टर बसविले आहेत. वाहनचालकांनी मुख्य चौकामध्ये वाहने सावकाश चालवावित. आपल्या वाहनाची व जीवाची काळजी घ्यावी. यामुळे अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होईल.- शिरीष पोरेड्डी, उपअभियंता, ह क्षेत्रीय कार्यालय, महापालिका