पिंपरी :चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील विहिरीत शनिवारी (दि. १२) कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. दारू पिताना तीन मित्रांमध्ये वाद झाला. यात दोन जणांनी मित्राच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून हा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यातही आरोपींनी खून केल्यानंतर घरफोडीचा प्रयत्न केला. त्यावेळी रंगेहाथ पकडले. मात्र, आरोपींनी त्यावेळी खुनाची कुणकुण पोलिसांना लागू दिली नाही.
गणेश उर्फ दाद्या भगवान रोकडे (वय १८), असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश रोकडे याची आई सुनीता भगवान रोकडे (वय ४०, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिषेक उर्फ डल्या गायकवाड (रा. चिंचवड) याच्यासह एका विधीसंघर्षीत मुलाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधीसंघर्षीत मुलगा, डल्या गायकवाड व गणेश रोकडे हे तिघेही मित्र होते. ते तिघेही बुधवारी (दि. ९) रात्री उशिरा चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ लोहमार्गालगत दारू पित होते. त्यावेळी मध्यरात्रीनंतर त्यांच्यात वाद झाला. यात विधी संघर्षीत मुलगा व डल्या गायकवाड यांनी गणेश रोकडे याच्यावर ब्लेडने व सुऱ्याने वार केले. यात गणेश रोकडे याच्या गुप्तांगावर देखील ब्लेडने वार केले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गणेश रोकडे याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याला लोहमार्गालगतच्या मोकळ्या जागेतील एका विहिरीत गणेश रोकडे याचा मृतदेह टाकून दिला.
दरम्यान, चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील विहिरीत एक मृतदेह असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना शनिवारी (दि. १२) मिळाली. गुप्तांगावर वार असल्याने अनैतिक संबंधांतून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला. मात्र, मित्रांनीच खून केल्याचे तपासातून निष्पन्न झाले.
कसून चौकशी केली असती तर...
गणेश रोकडे याचा मृतदेह विहिरीत टाकून दिल्यानंतर विधीसंघर्षीत मुलगा व डल्या गायकवाड या दोघांनी चिंचवड येथे चोरी करण्यासाठी घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र, काही नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून डल्या गायकवाड याला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी होणे आवश्यक होते. त्यामुळे कदाचित खुनाचा प्रकार गुरुवारीच (दि. १०) उघडकीस आला असता. मात्र, केवळ घरफोडीच्या अनुषंगाने चौकशी करून पोलिसांनी डल्या गायकवाड याला न्यायालयासमोर हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.