हिंजवडी : अत्यंत वर्दळीच्या अशा डांगे चौक रस्त्यावर गुरुवार (दि.२१) रोजी सायंकाळच्या सुमारास वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. दत्तनगर मधील छत्रपती संभाजी महाराज चौकात काल बुधवार (दि.२०) रोजी रात्री दहा नंतर पालिकेच्या ठेकेदाराने जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी मोठा खड्डा खोदला होता. मात्र, तो पूर्ववत न केल्याने याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा सहन करावा लागला.
सायंकाळी सात नंतर डांगे चौक बिर्ला रुग्णालय दरम्यान हिंजवडी आयटीपार्क कडून येणारी वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पहायला मिळाले. घरी जाण्याची प्रत्येकाला घाई असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. विशेष म्हणजे अतिशय महत्वाच्या चौकात कोणीही वाहतूक पोलीस तैनात नसल्याने वाहतूक कोंडी फोडणार कोण अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे काही बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक अधिकच ठप्प झाली.
दरम्यान, रात्री उशीरा वर्दळीच्या रस्त्यावर पालिकेच्या ठेकेदाराने भर चौकात खोदकाम केले मात्र, तेवढ्याच तत्परतेने ते पूर्ववत करणे गरजेचे होते. मात्र, पालिकेचा आडमुठा कारभार आणि वाहतुक पोलिसांची अनुपस्थिती यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली याचा नाहक त्रास आयटीयन्ससह नागरिकांना सहन करावा लागला. जवळच बिर्ला रुग्णालय असल्याने रुग्ण वाहिकांना सुद्धा वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना तारे वरची कसरत करावी लागली. अत्यंत वर्दळीचा रस्ता असल्याने छत्रपती संभाजी महाराज चौकात वाहतूक नियमन करण्यासाठी पूर्ण वेळ वाहतूक पोलीस तैनात असणं गरजेचे आहे असं स्थानिक नागरिक स्वप्नील चव्हाण यांनी सांगितले.