पिंपरी : पक्ष वेगळे, विचार वेगळे असले तरी महाराष्ट्रात मनोभेद नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. आम्ही महाराष्ट्रातील नेत्यांनी एकत्र येऊन मनोहर जोशी यांचा सन्मान केला. त्यावर संसेदत मुलायमसिंह यादव यांना मला ‘हे कसे काय?’ असा प्रश्न केला. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, ‘‘पक्ष वेगळे, मतं वेगळी असली तरी मनोभेद नसावेत, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, आता राजकारणात विचारभिन्नता ही नाही तर विचार शून्यता ही समस्या आहे, असे परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्राधिकरण येथे व्यक्त केले.
रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानाच्या वतीने प्राधिकरणातील पीसीईटीच्या सभागृहात आयोजित विजय जगताप संपादित प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यावरील ग्रंथांचे प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. सदानंद मोरे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, गजानन एकबोटे, हरी चिकणे आदी उपस्थित होते.
संतांचे ग्रंथ डिजीटल करणार
गडकरी म्हणाले, ‘‘शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून प्रा मोरे यांनी चांगले काम केले. त्यावेळी आम्हीं सभागृहात आपापली भूमिका परखडपणे मांडायचो. त्यावेळी आमच्यात विचारभिन्नता होती. मात्र, मनोभेद कधीही नव्हते. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांचे ग्रंथ डिजीटल करणार आहेत.
कामाचे श्रेय आणि हशा
उल्हास पवार म्हणाले, ‘‘प्रा. मोरे यांचे उत्तम वक्तृत्व अनुभवायला मिळाले. समयसूचक नेता होते. कार्यकते घडविणे आणि कार्यकर्त्यांना ताकद देणे त्यांचे वैशिष्टय होते. ज्याच्या कामाचे श्रेय त्याला देणे हा त्यांचा स्वभाव आहे. मात्र, आज दुसºयाच्या कामाचे श्रेय घेण्याची वृत्ती वाढत आहे. चांगली बोलण्यापेक्षा विक्षिप्त बोलणाºयांना माध्यमातून स्थान मिळते. आणि आता कामापेक्षा बोलण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे.’’ त्यावर उपस्थितांतून हशा उसळला.
धर्माला संकुचित करू नये
दिग्विजय सिंह म्हणाले, ‘‘लेखक, पत्रकार आणि राजकारणी असे अद्भूत प्रतिभाशाली व्यक्तीमत्व म्हणजेच प्रा. मोरे होय. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात त्यांचे योगदान आहे. कला, शिक्षण, साहित्य, नाटक, सामाजिक प्रश्नांची जाण असणारे हे व्यक्तीमत्व होते. वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख यांच्या बरोबर त्यांनी चांगले काम केले. मात्र, दुभाग्य त्यांना अल्प आयुष्य लाभले. संतांनी पंढरीच्या वारीतून विश्वात्मक आणि व्यापक विचार दिला आहे. धर्म संकल्पना व्यापक आणि त्यास संकुचित करू नये.’’