पिंपरी : लोकसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी झाले. पिंपरी-चिंचवड शहरातील मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी, सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या पहिल्याच टप्प्यात मतदान केले.
महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगावच्या संचेती विद्यालय या मतदान केंद्रावर परिवारासह रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी पत्नी सरिता, पुत्र प्रताप व विश्वजित, सून स्नेहा यांच्यासह मतदान केले. त्यावेळी त्यांचा अडीच वर्षांचा नातू राजवीरही सोबत होता. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी पत्नी उषा वाघेरे, मुलगा ऋषिकेश वाघेरे यांच्यासोबत पिंपरीतील मतदान केंद्रावर मतदान केले. आमदार अश्विनी जगताप यांनी कन्या ऐश्वर्या जगताप-रेणुसे यांच्यासह पिंपळे गुरव येथील माध्यमिक विद्यालयात मतदान केले.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरीत, तर आमदार उमा खापरे यांनी श्रीधरनगर येथील माटे हायस्कूल येथे मतदान केंद्रावर यांनी मतदान केले. यावेळी पती गिरीश खापरे, मुलगा जयदीप खापरे यांनीही मतदान केले. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्नी श्वेता बनसोडे, प्रिया बनसोडे, मुलगा सिद्धार्थ बनसोडे यांच्यासोबत चिंचवड स्टेशन येथील महात्मा फुले शाळा क्रमांक १ तळमजला खोली क्रमांक ३ येथे सकाळी आठला मतदान केले.
मावळचे आमदार सुनील शेळके, तर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी तळेगाव दाभाडेत, माजी आमदार रूपलेखा ढोरे यांनी वडगाव मावळ येथे कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सकाळी दहा वाजता प्राधिकरणात, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी अजमेरा काॅलनीतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गहुंजे येथील मतदान केंद्रावर, तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध नर्तक डाॅ. पं. नंदकिशोर कपोते यांनी निगडीतील रूपीनगर शाळा येथे मतदान केले.