पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या रकमेवर दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यातून दोघांची सव्वा कोटींची फसवणूक केली. पिंपळे सौदागर येथे १९ ऑक्टोबर २०२० ते २५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
भालचंद्र जगताप (वय ४२, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जितेंद्र सुखलाल मालखेडे (वय ३८, रा. गणेश मंदिराजवळ, प्राधिकरण, निगडी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी व त्यांचे नातेवाईक सूर्यकांत काळे यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास एकूण रकमेवर मुद्दल रकमेसहित दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईक मित्राकडून एक कोटी ७४ लाख ८० हजार रुपये घेतले. त्यानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यात गुंतवलेल्या रकमेवर ठरल्याप्रमाणे दीडपट परताव्याची रक्कम म्हणून फिर्यादी यांना ३७ लाख ८० हजार १२१ रुपये, तर फिर्यादी यांचे नातेवाईक काळे यांना १३ लाख ५५ हजार रुपये, असे एकूण ५१ लाख ३५ हजार १२१ रुपये परत दिले.
दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपीकडे उर्वरित पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपीने त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत भेटण्यास टाळाटाळ केली. अशाप्रकारे आरोपीने फिर्यादी व त्यांचा मित्र काळे या दोघांची एकूण एक कोटी २३ लाख ४४ हजार ८७९ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करीत आहेत.