पिंपरी : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी येथे दीड महिन्यापूर्वी हा प्रकार घडला. पीडित महिलेने याप्रकरणी मंगळवारी (दि. १३) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मनोज लक्ष्मणदास बक्षानी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज बक्षानी हे सेवा विकास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आरोपीने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. याबाबत कुणाला सांगितले तर खोटे गुन्हे दाखल करण्याची व कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतरदेखील आरोपीने वेळोवेळी फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन केले, असे फिर्यादीत नमूद आहे. यापूर्वी आरोपीवर रविवारी (दि. ११) पिंपरी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पीडित महिलेलादेखील आरोपीने खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देत त्यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच आरोपीला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी महिलांनी केली आहे.