- नारायण बडगुजर
पिंपरी :गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत व निर्विघ्न पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी मिरवणूक मार्गांवर, विसर्जन घाटांवर तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त राहणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी १४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. यासह साडेतीनशे वाॅकीटाॅकी, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ‘वाॅच’ राहणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत चिंचवड आणि पिंपरी येथे मुख्य मिरवणूक असते. यात चिंचवड येथील थेरगाव घाट मार्गावरील मिरवणुकीत जास्त मंडळे सहभाग घेतात. पिंपरी येथील सुभाषनगर येथील घाटावर विसर्जनासाठी शगुन चौक मार्गे जाणाऱ्या मंडळांची संख्या जास्त असते. त्यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात केला जातो. चिंचवड येथील चापेकर चौकात आणि पिंपरी येथील शगुन चौकात महापालिकेकडून स्वागत कक्ष उभारले जातात. या दोन्ही चौकात तसेच विसर्जन घाटांवरही पोलिसांकडून वाॅच टाॅवर राहणार आहेत. शगुन चौकात वायरलेस स्टॅटिक टाॅवर उभारला आहे.
पोलिसांकडे ४०० ‘वाॅकीटाॅकी’
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या १८ पोलीस ठाण्यांकडे १०७ तर वाहतूक विभागाकडे १२७ वाॅकीटाॅकी आहेत. यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही ‘वाॅकीटाॅकी’ आहेत. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस आयुक्तालयाच्या बिनतारी संदेश वहन विभागाने १०० ‘वाॅकीटाॅकी’ उपलब्ध केल्या आहेत. पोलीस ठाण्यांना आवश्यकतेनुसार या जास्तीच्या वाॅकीटाॅकी दिल्या आहेत. त्यामुळे मिरवणुकीत ४०० ‘वाॅकीटाॅकी’ असलेले पोलीस राहणार आहेत.
११२ हेल्पलाइनसह नियंत्रण कक्ष सज्ज
पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून ‘कंट्रोल’ ठेवण्यात येणार आहे. राखीव तुकडी आणि जलद प्रतिसाद पथक सज्ज राहणार आहे. नागरिकांसाठी ११२ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. त्यावरील आलेल्या प्रत्येक ‘काॅल’ला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत.
वाहतूक शाखेकडून नियोजन
विसर्जन मिरवणूक मार्गांवरील वाहतुकीत बदल केले आहेत. तसेच या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाच्या चिंचवड येथील नियंत्रण कक्षातून मिरवणुकीवर ‘वाॅच’ राहणार आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात येणार आहे.
ध्वनी प्रदूषण मापकांचे ‘कॅलिब्रेशन’
विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी ध्वनी प्रदूषण मापक यंत्रांचे ‘री-कॅलिब्रेशन’ करून प्रत्येक पोलीस ठाण्यांना दिले आहेत. मिरवणुकीत प्रत्येक मंडळाजवळ या यंत्राच्या माध्यमातून पोलीस आवाजाच्या पातळीची नोंद करणार आहेत.
तीन सर्व्हिलन्स व्हॅन
पोलीस आयुक्तालयाकडे तीन सर्व्हिलन्स व्हॅन आहेत. परिमंडळ एक आणि परिमंडळ दोनसाठी प्रत्येकी एक आणि मुख्यालयाकडे एक व्हॅन आहे. मिरवणुकीत दोन व्हॅन राहणार आहेत. तर एक व्हॅन राखीव म्हणून सज्ज ठेवण्यात येणार आहे.
स्वयंसेवक, पोलीस मित्रांची ‘सेवा’
पोलीस आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनात विसर्जन मिरणुकीचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. पोलीस मित्र, शांतता समिती सदस्य यासह विविध पथक आणि विवध संघटनांच्या स्वयंसेवकांकडून विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक नियमनासाठी त्यांच्याकडून पुढाकार घेण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी वाॅकीटाॅकीसह अद्यायावत साधने उपलब्ध केली आहेत. वाॅच टाॅवर, वायरलेस स्टॅटिक टाॅवर उभारण्यात आले आहेत. ध्वनी मापक यंत्रे २५ उपलब्ध केली आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषण झाल्यास नोंद करता येणार आहे.
- शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक, बिनतारी संदेश विभाग
बंदोबस्तासाठीचा फौजफाटा
पोलीस उपायुक्त - ३सहायक आयुक्त - ८पोलीस निरीक्षक - ४६सहायक/उपनिरीक्षक - १३८पोलीस अंमलदार - १२०७होमगार्डस - २५४एसआरपीएफ प्लाटून - ४