पिंपरी : चिखलीत भरदिवसा तरुणावर गोळीबार करण्याची घटना सोमवारी दुपारी घडली. दिवसाढळ्या हल्ले आणि गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. त्यांना रोखण्यात पोलिस दलास अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. पूर्ववैमनस्यांतून हल्ला करणे, किरकोळ कारणावरून हाणामारीच्या घटनांमध्येही पिस्तुले वापरण्यात येत आहेत. ही पिस्तुले येतात कोठून? याचे मूळ शोधून त्यावर उपाय करण्यात अद्यापही पोलिसांना पूर्णपणे यश आलेले दिसत नाही. त्यामुळे कष्टकऱ्यांचीनगरी आता गुन्हेगारी कृत्यांमुळे कुप्रसिद्ध होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशातून पिस्तुले येत असल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. मात्र, त्यांना रोखण्यासाठी आणि पिस्तुलांचे रॅकेट उदधवस्त करण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांलयाची निर्मिती झाल्यानंतर गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, असे शहरवासीयांना वाटत होते. मात्र, गेल्या दीड वर्षांत गावठी कट्टे आणि पिस्तुले आढळून येण्याच्या आठ घटना आयुक्तालय परिसरात घडल्या आहेत, तर गेल्या पंधरा दिवसांचा आढावा घेतल्यास तळेगाव दाभाडे येथे राजकीय नेते किशोर आवारे यांची पालिका भवनासमोर गोळ्या घालून, तसेच कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर सोमवारी चिखलीत सोन्या तापकीर या तरुणांवर गोळीबार करून खून करण्यात आला.
या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे
मात्र, गेल्या दीड वर्षात गावठी कट्टे आणि पिस्तुले आढळून येण्याच्या आठ घटना आयुक्तालय परिसरात घडल्या आहेत. त्यात चिंचवड, हिंजवडी, चाकण, चिखली, देहूरोड, आळंदी, तळेगाव दाभाडे या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पिस्तूल बाळगणारे आरोपी वारंवार आढळून आले आहेत. बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांना एकदा पकडले जाते. बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल होतो. जामिनावर सुटल्यानंतर हे आरोपी पुन्हा शस्त्र खरेदी करतात. पिस्तूल विक्रीच्या या छुप्या बाजारपेठेची त्यांना चांगलीच माहिती असते. पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केले, तरी ते आणखी पिस्तूल मिळवितात, हे मूळ पोलिसांनी शोधायला हवे.
पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीत दीड वर्षांत पिस्तुले सापडण्याच्या आठ घटना घडल्या आहेत. त्यात काडतुसे आणि पिस्तुले् गावठी कट्टे आढळले आहेत. हे पिस्तूल येतात कोठून याचे मूळ शोधून काढायला हवे.
दहशत माजविण्यासाठी तलवारी नाचविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यासोबतच खून, धमकावणे आणि खंडणी वसुलीच्या प्रकरणात राजरोसपणे पिस्तुलाचा वापर केला जात आहे. चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात आणि तसेच निर्जन ठिकाणी रस्त्यात अडवून लुटण्यासाठी पिस्तुलाचा किंवा खून आणि हल्ला करण्यासाठी पिस्तुले वापरली जातात. तसेच येथील जमिनीला सोन्याचा भाव आल्याने वाढदिवसाला हवेत गोळीबार करण्याच्या घटना उपनगरामध्ये घडलेल्या आहेत. याची नोंद पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये नोंदविली गेली आहे.
उत्तर प्रदेशाशी पिस्तुलाचे कनेक्शन
पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाच्या आणि स्थानिक पोलिसांच्या मार्फत कारवाई केली जाते. पिस्तूल, गावठी कट्टे विक्री करणारे आढळून येत आहेत. परराज्यांतून गावठी कट्टे, पिस्तूल आणली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
चाकण म्हाळंगे, २६ डिसेंबर २०२२
शस्त्र बाळगल्याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी सूर्यप्रताप गंधर्वसिंह (वय २२, रा. भांबोली, ता. खेड) यास अटक केली होती. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली होती. खालुंब्रे येथे चौकात सायंकाळी एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असा २६ हजारांचा ऐवज जप्त केला होता.
चिंचवड : २८ डिसेंबर २०२२
गावठी बनावटीची पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणास शस्त्र विरोधी पथकाने चिंचवड येथून सुशील मारुती सरोदे (वय ३१, रा. चिंचवड) याला अटक केली होती. सरोदे याला २५ हजार रुपयांची गावठी बनावटीची पिस्तूल व ३०० रुपयांचे जिवंत काडतुसासह रंगेहात पकडले होते.
शिरगाव - परंदवडी आणि चाकण : २८ जानेवारी २०२३
परंदवडी आणि चाकण अशा दोन वेगवेगळ्या कारवाईत बेकायदा पिस्तूल बाळगणारे दोघे जेरबंद केले होते. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, एक मोटार असा मुद्देमाल जप्त केला आहे. साळुंब्रे येथे केलेल्या कारवाईत सागर चंद्रकांत नखाते (वय ३२, रा. सतेज चौक, औंध) याला अटक केली. एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि ४०० रुपयांची दोन जिवंत काडतुसे आढळली. तसेच चाकण येथे केलेल्या कारवाईत प्रमोद ऊर्फ गोट्या अनिल शिंदे (वय ३१, रा. रानमळा, कडूस, ता. खेड) याला अटक केली होती. स्कॉर्पिओ मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली होती.
चाकण - २८ डिसेंबर २०२२
चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करून अबिद सिकंदर शेख (वय २९, रा. एकतानगर, चाकण) असे अटक केली होती. तीन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे असा १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला केला होता.
कृष्णानगर चिंचवड - एप्रिल २०२२ आणि १५ मे २०२२
मला दर महिन्याला हप्ता दिला नाही तर इथून तुमची एकही ट्रॅव्हल्स गाडी जाऊ देणार नाही असे म्हणत जिवे मारण्याची धमकी देत एकाने पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाकडे दोनदा खंडणी मागितली होती. ही घटना एप्रिल २२ मध्ये कृष्णानगर भाजी मंडई चौक आणि १५ मे २२ रोजी कृष्णानगर चौक चिखली येथे घडली होती. फिर्यादी यांच्या मुलाला आरोपीने बाजूला नेऊन त्याच्या कमरेला हात लावला. माझ्याजवळ पिस्तूल आहे. हप्ता दिला नाही तर मर्डर करून टाकेन, अशी धमकीही आरोपीने दिली होती.
देहूरोड- २६ मे २०२२
बांधकाम व्यावसायिक तरुणाकडील परवानाधारक पिस्तूल कपाटातील कपडे काढताना खाली पडले आणि पिस्तुलातून गोळी सुटली. ही गोळी कपाटाच्या दरवाजातून आरपार होऊन तरुणाच्या आईच्या पायाला लागली. यामध्ये आई गंभीर जखमी झाली होती. ही घटना देहूगाव येथे घडली होती.
चाकण - २ मार्च २०२३
आळंदी - चाकण रस्त्यावर एका हॉटेलसमोर दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेल्या नऊजणांना आळंदी पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता केली होती. त्यात नऊजणांना अटक केली होती. पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता एक नकली पिस्तूल आढळून आले होते. तसेच मुद्देमालही जप्त केला आहे.
तळेगाव दाभाडे, १२ मे २०२३
तळेगाव दाभाडे येथील नगरपालिका कार्यालयासमोर राजकीय नेते किशोर आवारे यांच्यावर गोळीबार करून सहाजणांनी हत्या केली. भर दिवसा आणि नागरिकांच्या समोरच ही निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी सहाजणांना अटक केली आहे. हल्ले आणि खुनाच्या घटनांत पिस्तुले वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.