पिंपरी : नव्याने बांधकाम होत असलेल्या इमारतीत घर पाहण्यासाठी आलेल्या पत्नीला पाचव्या मजल्यावरून ढकलून जीवे मारल्याप्रकरणी दाखल खटल्यात पतीसह दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आळंदी येथे २८ ऑक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली होती.
देवीदास तुकाराम पालवे (वय ३७, रा. तीनखडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) तसेच त्याचा वाहनचालक निवृत्ती उर्फ गोट्या शेषराव घुले (वय २८, रा. शेकटे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), अशी निर्दोष मुक्तता केलेल्या दोघांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायालय राजगुरूनगर खेड येथील न्यायाधीश ए. म. अंबळकर यांच्या कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.
मंदा देवीदास पालवे (रा. तीनखडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आपण आळंदी येथे नवीन घर घेऊ आणि मुलांच्या शिक्षणासाठी कायमस्वरूपी पुण्यातच राहूया, असे सांगून देवीदास पालवे हे पत्नी मंदा पालवे यांना घेऊन आळंदी येथे आले. नव्याने बांधकाम होत असलेल्या इमारतीमधील नवीन सदनिका पाहण्यासाठी ते पाचव्या मजल्यावर गेले. त्यावेळी त्यांची मुले व भाऊ इमारतीच्या खाली गेल्यानंतर मंदा पालवे यांचा पडून मृत्यू झाला. पती देवीदास पालवे यांनी पत्नी मंदा यांना ढकलून जीवे मारले, अशी तक्रार करण्यात आली. त्यावरून देवीदास पालवे आणि त्याचा वाहनचालक निवृत्ती उर्फ गोट्या घुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदा पालवे यांना आपण ढकलले नसून इमारतीवरून मोकळ्या जागेतून ती चुकून घसरून पडली, असे सांगत देवीदास पालवे यांच्याकडून बचाव करण्यात आला.
परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असलेल्या या केसमध्ये सरकारी पक्षाद्वारे ११ साक्षीदारांनी आपली साक्ष नोंदवली. परंतु, तपासामधील त्रुटी व साक्षीदारांची उलटतपासणी यामध्ये मंदा पालवे यांचा मृत्यू ही हत्या असल्याचे सिद्ध झाले नाही. फिर्यादी व साक्षीदारांच्या उलटतपासणीमध्ये केवळ वैयक्तिक आकसापोटी आरोपींच्या विरोधात त्यांनी जबाब देण्याचे काम केल्याचे उघड झाल्याने, देवीदास पालवे आणि निवृत्ती घुले या दोघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे ॲड. मंगेश धुमाळ यांनी काम पाहिले. तर सरकारी पक्षातर्फे ॲड. विकास देशपांडे यांनी काम पाहिले.