पिंपरी : जुन्या वादातून पायी चाललेल्या दाम्पत्याला टेम्पोने जोरदार धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. यात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीकडून अपघाताचा बनाव रचण्यात आला. वाकडपोलिसांनी घातपाताच्या संशयावरून एकाला अटक केली आहे. अटकेतील आरोपीकडे तपास करून आणखी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
लता संतोषकुमार कांबळे (वय ४५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रोहित गायकवाड (२३, रा. हडपसर), आनंद वाल्मीकी (२९, वाकड), परशुराम ऊर्फ परश्या माने (२४, वाकड) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच एका विधिसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. तर यामध्ये सहभागी असलेला शाहरुख युनूस शेख हा फरार आहे.
वाकड काळाखडक येथून पायी जाणाऱ्या दाम्पत्याला ३ मार्च रोजी टेम्पोने जोरदार धडक दिली. त्यामध्ये लता कांबळे यांचा मृत्यू झाला. तर संतोषकुमार कांबळे हे गंभीर जखमी झाले. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासादरम्यान अपघातापूर्वी तीन ते साडेतीन तासांपूर्वी घटनास्थळाच्या परिसरात येण्या-जाण्याच्या मार्गावर एक पिकअप टेम्पो संशयितरीत्या फिरत असल्याचे दिसून आले. दाम्पत्य परिसरातून पायी येत असल्याचे दिसताच टेम्पोने त्यांना भरधाव वेगाने धडक दिली. त्यामध्ये महिला मृत झाली.
आरोपीने दिली कट रचल्याची कबुली
टेम्पोची माहिती घेऊन पोलिसांनी रोहित गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता, इतर दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच यामध्ये सहभागी असलेला शाहरुख युनूस शेख हा फरार आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींकडे तपास केला असता त्यांनी हा अपघात नसून पूर्वीच्या वादातून महिलेला जीवे मारण्याचा कट रचल्याचे कबूल केले.