पिंपरी : प्राप्तीकर विभागाने पिंपरी-चिंचवडमधील तीन बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर आणि कार्यालयावर गुरुवारी (दि. २३) छापे मारले. नेमकी कोणत्या प्रकरणात कारवाई झाली, याची अधिकृत माहिती समजू शकली नाही. मात्र, या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. आपल्यावरही अशी कारवाई होऊ शकते, अशी चर्चा शहरातील इतर बड्या बांधकाम व्यावसायिक व उद्योजकांध्येही सुरू झाली.
बांधकाम व्यावसायिकाच्या पिंपरी येथील घरी गुरुवारी सकाळी प्राप्तीकर विभागाची वाहने दाखल झाली. अधिकाऱ्यांनी घराची झडती घेत तपासाला सुरुवात केली. दरम्यान, त्याच वेळी त्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात देखील प्राप्तीकर विभागाचे पथक दाखल झाले. त्याचबरोबर प्राप्तीकर विभागाने गुरुवारी वाकड आणि किवळे येथील बांधकाम व्यावसायिकांवर देखील कारवाई केली. यामध्ये प्राप्तीकर विभाग कोणत्या प्रकरणाची चौकशी करत आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
शहरात एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाने कारवाई केल्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी देखील शहरातील काही बड्यांसह वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असलेल्या कंपनीच्या कार्पोरेट व मुख्य कार्यालयावर देखील छापे मारले होते. तसेच इतर शासकीय यंत्रणांकडून देखील सातत्याने शहरातील उद्योजक व बांधकाम व्यावसायिकांच्या घर व कार्यालयांवर छापे मारण्यात आले. त्यामुळे या कारवाईची देखील चर्चा सुरू झाली आहे.