पिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीतील आरक्षित जागेवरून निवडून आलेल्यांना शासनाने सहा महिन्यांत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत दिली होती. मुदतीनंतर राज्य शासनाने पंधरा दिवसांची वाढीव मुदत दिली होती. ही मुदत १२ आॅक्टोबरला संपत असून, सत्ताधारी भाजपाच्या दोन नगरसेवकांची अडचण वाढली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये २२ आॅगस्ट २०१७ पर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत दिली होती. या मुदतीत भाजपाच्या चार नगरसेवकांनी जात प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते. चारपैकी दोघांनी न्यायालयाने दिलेल्या मुदतीत प्रमाणपत्र सादर केले. चिखली प्रभाग क्रमांक एक ‘अ’ या राखीव जागेवरून भाजपाचे उमेदवार कुंदन गायकवाड हे निवडून आले आहेत. तर, भोसरी धावडेवस्ती, भगतवस्ती प्रभाग क्रमांक सहा एक-अ या राखीव जागेवर निवडून आलेल्या नगरसेविका यशोदा बोईनवाड यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आढळून आले. कारण त्यांची प्रकरणे न्यायप्रवीष्ट आहेत. दरम्यान, कोल्हापूर महापालिकेत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये जात प्रमाणपत्र सादर केले नव्हते.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर म्हणाले,‘‘निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांची माहिती राज्य सरकारने मागितली होती. त्यात महापालिकेतील चार नगरसेवकांनी विहित मुदतीत प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे शासनास कळविले होते. राज्य सरकारने पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली होती. जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ आॅक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर शासनास अहवाल सादर केला जाईल.’’