पिंपरी : भारत हे लोकशाही राष्ट्र असून लोकशाहीमध्ये जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क असतो. महाविद्यालयीन युवक हा मतदानाचा महत्वाचा घटक असून देशाचे भवितव्य घडविणे त्यांच्या हातात असते. तेव्हा युवकांनी जनतेमध्ये जावून मोठ्या प्रमाणात मतदान करणेबाबत जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी यांच्या सहकायार्ने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त युवा महोत्सवातील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करताना ते बोलत होते.
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी समिक्षा चंद्रकार, उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, सह आयुक्त दिलिप गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, अण्णा बादडे, माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी अलका कांबळे, तहसिलदार महेश पाटील, पल्लवी घाटगे, नायब तहसिलदार स्नेहा चाबुकस्वार तसेच सुषमा पैकीकरी, अंजली सावंत, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, परिक्षक सविता कुलकर्णी, शाम लांडगे, रमेश वाकनीस, सुनिल देशपांडे, सतिश परदेशी, रंजिता चॅटर्जी, डॉ.सुधीर बोराटे, प्रा. रामदास लाड. दिप्ती यादव, नम्रता आल्हाट आदि उपस्थित होते.
वाघमारे म्हणाले, ‘‘लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाची आवश्यकता असते. हे पटवून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने युवा महोत्सव व मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षीच्या महापालिका निवडणूकीमध्ये ज्या प्रभागामध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती त्याप्रभागामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी मतदान जनजागृती मोहिम राबवावी. ’’