पिंपरी : भामा आसखेड प्रकल्पातून पिंपरी- चिंचवड शहरासाठी पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या जॅकवेल व पंप हाऊसच्या खर्चात २२ कोटी रुपयांची वाढ होईल. कामाची मूळ अंदाजपत्रकीय तरतूद १५० कोटी रुपये होती. त्यामध्ये आता आणखी २२ कोटी रुपयांची वाढ केली आहे.
महापालिकेच्या सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात भामा आसखेड प्रकल्पांतर्गत जॅकवेल व पंप हाऊस बांधण्याच्या कामांचा समावेश आहे. कामाचे नाव अपुऱ्या स्वरूपाचे आहे. तसेच या कामास अंदाजपत्रकीय रक्कम कमी आहे. त्यामुळे कामाच्या नावात बदल केला आहे. या कामाची मूळ अंदाजपत्रकीय रक्कम १५० कोटी रुपये इतकी आहे. वस्तू व सेवा कर १८ टक्के, सल्लागाराची फी ५ टक्के व १० वर्षे देखभाल दुरुस्ती करणे याचा अंतर्भाव आहे. नवीन दरसूचीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे कारण देत अंदाजपत्रकीय रकमेमध्ये वाढ केली आहे. कामाची मूळ रक्कम १५० कोटी होती, ती आता १७२ कोटी रुपये केली आहे.
निगडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणार
निगडी जलशुद्धीकरण केंद्रासाठी ३५ कोटी ७७ लाख ४६ हजार ३६४ खर्चाची निविदा काढली होती. आतापर्यंत एकूण ७० टक्के काम झाले. विशेष योजना निधीतून हा खर्च केला आहे. या केंद्राची क्षमता ४२८ एमएलडी आहे. वीस टक्के अधिक या पद्धतीने ५२० एमएलडी पाणी दररोज शुद्ध केले जाते. क्षमता वाढीचे काम करत असताना कोरोना महामारीमध्ये वाढीव दराने साहित्य घेऊन ठेकेदाराने काम केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. दरम्यान, राज्य शासनाने असाधारण भाववाढीसाठी विशेष मदत देण्याचा निर्णय २९ जून २०२२ ला प्रसिद्ध केला आहे. त्या निर्णयानुसार विशेष मदत देण्याची मागणी संबंधित ठेकेदाराने १ जुलै २०२२ ला केली होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर एकूण खर्चावर १८ टक्के जीएसटी खर्च देण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने सादर केला होता. त्याला आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे.