पुणे/पिंपरी : बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लूसह डेंगी आणि चिकुनगुनिया या आजारांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या तपासणीत सप्टेंबरअखेरपर्यंत ५००हून अधिक रुग्णांची रक्ततपासणी करण्यात आली. यामध्ये २००हून अधिक रुग्णांना डेंगी आणि चिकुनगुनियाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये दीडशे रुग्ण हे डेंगीचे, तर ५० रुग्ण चिकुनगुनियाचे आहेत. दरम्यान, डेंगीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाकडून गाव आणि आसपासच्या परिसरात तपासणी करून, डेंगीच्या डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट केली जात आहेत. तसेच, औषधफवारणी केली जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.
वाढते तापमान तसेच अचानक कोसळणारा पाऊस यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्यात आजारांचेही प्रमाण वाढले आहे. याचबरोबर स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले असून, मागील दोन महिन्यांत आठ जणांचा फ्लूने मृत्यू झाला आहे. डेंगी आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. आरोग्य विभागातर्फे सप्टेंबरअखेरपर्यंत पाचशेहून अधिक रुग्णांची रक्ततपासणी करण्यात आली. यात दोनशेहून अधिक रुग्णांना डेंगी आणि चिकुनगुनियाची लागण झाल्याचे आढळले. यातील दीडशे रुग्णांना डेंगी, तर ५० रुग्णांना चिकुनगुनियाचे लक्षण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.हवेली तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या असून, चिकुनगुनियाचे ३५, तर डेंगीचे ८३ रुग्ण आढळून आले.आॅगस्ट २०१८ अखेर साडेतीनशे व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये २३२ डेंगीचे रुग्ण आढळले.यातील जवळपास ७० रुग्णांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. चिकुनगुनियाच्या ११३ व्यक्तींचेरक्ताचे नमुने घेण्यात आले. यात १०२ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अॅलर्ट करण्यातआली आहे.पिंपरी-चिंचवडशहरात १ जानेवारीपासून अद्यापपर्यंत २८ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. तर २०८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ९ हजार ५७३ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत.वाढत्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. आरोग्य पथक दिवस-रात्र काम करीत असून साथीच्या आजाराबांबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातही पथके नेमण्यात आली आहेत. हे पथक गावांमध्ये औषधफवारणी करणे, डासांच्या पैदासीचे ठिकाण नष्ट करणे ग्रामसभा घेणे, असे विविध उपक्रम राबवत आहे. जिल्ह्यात आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून तो रुग्णांना पुरविण्यात येत आहे. नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवून कोरडा दिवस पाळावा.- डॉ. दिलीप माने,जिल्हा आरोग्य अधिकारी