वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच काही गावांतील दूषित सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने आंबी, वराळे गावच्या हद्दीत नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे.इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणी जलचर, प्राणी व मानवी आरोग्यास धोकादायक झाले आहे. नदीपात्रात सोडले जाणारे रासायनिक व दूषित सांडपाणी रोखून नदीपात्रातील जलपर्णी काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या मावळ तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने तालुक्यातील इंद्रायणी, पवना, कुंडलिका, सुधा, आंद्रा या नद्यांचे पात्र असून, पावसाळ्यात दुथडी वाहतात. या नद्यांचे पाणी अमृत मानले जाते तर याच पाण्यावर अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्या नळपाणीपुरवठा योजना आहेत. मात्र सध्या या नदीचे पाणी दूषित झाले असून, जलचर, प्राणी व मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास झाल्याने नागरीकरणात वाढ होत आहे. कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी, मेला, तसेच कचरा, ओढे व नाल्यांतून नदीपात्रात सोडले जाते तसेच गावोगावचे व गृहप्रकल्पाच्या दूषित सांडपाण्याचे व्यवस्थापन अथवा कोणतीही प्रक्रिया न करता सर्रासपणे नदीपात्रात सोडले जात आहे. तसेच नदीपात्रात कपडे, म्हैशी, बैल, गायी व इतर जनावरे धुतली जातात. देवाच्या पूजेचे साहित्य पात्रात टाकले जाते.ग्रामपंचायती, नगर परिषद व औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांनी त्यांच्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करूनच नदीपात्रात सोडावे. नदीपात्रात जलपर्णी काढण्यासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद नाही. नदी प्रदूषण रोखण्यासाठी गावातील तरुण मंडळ व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची काळाची गरज आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. .........पिण्याचे पाणीही दूषित : आरोग्य धोक्यातमावळ तालुक्यात मुबलक पाणी मिळत आहे. मात्र नदीच्या उगमस्थानापासून प्रदूषण सुरू होते ते शेवटपर्यंत प्रदूषण असते. ग्रामपंचायत, नगर परिषद व औद्योगिक कारखान्यांच्या पिण्याच्या पाण्याचे जोडलेल्या जलवाहिनीच्या नदीपात्राजवळची स्थिती खूपच बिकट आहे. पाणी शुद्धीकरण केले तरी त्यातील रासायनिक घटक पाण्यातच असल्याने जलचर, प्राणी व मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांडपाणी नदीत न सोडण्याचे ठराव केवळ कागदोपत्रीच मंजूर केले जात असून, प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही. ग्रामपंचायती, नगर परिषद व औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांनी त्यांच्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करूनच नदीपात्रात सोडावे. नदीपात्रात जलपर्णी काढण्यासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद नाही. नदी प्रदूषण रोखण्यासाठी गावातील तरुण मंडळ व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची काळाची गरज आहे. तसेच दूषित सांडपाणी नदीपात्रात सोडणाºयांवर कारवाई केली तर हे थांबेल अन्यथा तालुक्यातील नदीपात्रात पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल.
आंबी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाढले प्रदूषण : प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 2:04 PM
इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणी जलचर, प्राणी व मानवी आरोग्यास धोकादायक झाले आहे.
ठळक मुद्देऔद्योगिक क्षेत्रातील पाणी सोडल्याने धोकागावातील तरुण मंडळ व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची काळाची गरज