पिंपरी : उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर अजित पवार यांची ‘पॉवर’ वाढली असून, पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप आणि शिवसेनेचे स्थानिक नेते मात्र अस्वस्थ झाले आहेत. दहा वर्षे राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटणाऱ्या भाजप आणि शिवसेना नेत्यांची अवस्था ‘सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली’, अशी झाली आहे. शहरात राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर २०१७ पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व होते. तत्कालीन सांस्कृतिक मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर २००४ पासून अजित पवार यांचा एकहाती अंमल होता. त्यातून एकेकाळी सर्वाधिक सदस्य संख्या असणाऱ्या महापालिकेत २०१७ ला काँग्रेस शून्यावर आली. केंद्रात आणि राज्यात आघाडी असतानाही अजित पवारांनी काँग्रेसला पद्धतशीर संपवले. यादरम्यान सलग पंधरा वर्षे ते पुण्याचे पालकमंत्री होते.
अशी बदलली सूत्रे-
२०१४ ला विधानसभेत भाजप आणि शिवसेनेला यश मिळाल्यानंतर गिरीश बापट यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे आली. बापट यांच्या निधनानंतर चंद्रकांत पाटील पालकमंत्री झाले. २०१९ ला पुन्हा पवार पालकमंत्री झाले. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळून महायुती आली आणि चंद्रकांत पाटील यांना संधी मिळाली. आता राष्ट्रवादी महायुतीत समाविष्ट झाल्यानंतर पुन्हा पवार यांची वर्णी लागली.
विरोध करूनही नेत्यांनी ऐकलेच नाही
अजित पवार भाजपबरोबर गेल्यानंतर जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. पालकमंत्रीपद भाजपकडेच राहावे, अशी मागणी केली. मात्र, ती मान्य झाली नाही. उलट पवारांकडे अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्रीपद दिल्याने अस्वस्थता आहे.
जगताप, लांडगेंच्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीवेळी फक्त राष्ट्रवादीचेच नेते उपस्थित होते. भाजपच्यावतीने आमदार महेश लांडगे, शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे आढावा बैठका घेत आहेत. पवारांनी लक्ष केंद्रित केल्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांत अस्वस्थता पसरली आहे. २०१४ ला राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी पाच वर्षे भाजपची सत्ता गाजविली. यादरम्यान जगताप यांचे निधन झाले. त्यांचा गट प्रबळ आहे. मात्र, पवार यांच्या निवडीने जगताप, लांडगे यांच्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.