पिंपरी : महापालिकेसाठी अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे मंजूर झाल्याने राज्य सरकार सेवेतून प्रतिनियुक्तीने आलेल्या अतिरिक्त आयुक्तांसाठी सुधारित विषय वाटप करण्याचे आदेश आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. त्यानुसार २५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांना बहाल केले आहेत. महापालिकेसाठी अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे मंजूर केली आहेत. या दोन पदांपैकी एक अतिरिक्त आयुक्तांचे पद राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरले आहे. तर, अतिरिक्त आयुक्तांचे एक पद महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांमधून नव्याने भरण्यात येणार आहे. हे पद सध्या रिक्त आहे. प्रतिनियुक्तीने भरलेल्या पदाला अतिरिक्त आयुक्त - एक असे संबोधण्यात येणार आहे. तर महापालिकेतील अधिकाऱ्यांमधून निवडीने भरण्यात येणाऱ्या पदाला अतिरिक्त आयुक्त - दोन असे संबोधण्यात येणार आहे. सध्या अतिरिक्त आयुक्त- १ म्हणून तानाजी शिंदे हे कार्यरत आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त एक यांना सुधारित विषय वाटप करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त एक यांच्याकडे सध्या सर्व प्रभाग कार्यालये, सर्व प्रभाग समितींचे कामकाज, स्थायी समिती वगळता इतर सर्व समित्यांचे कामकाज, भूमी जिंदगी विभाग, आकाशचिन्ह व परवाना, अतिरिक्त आयुक्त कार्यालय, अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, प्रेक्षागृहे, सार्वजनिक वाचनालये, कामगार कल्याण, कायदा, दूरसंचार, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उद्यान, क्रीडा आदी विभागांचे कामकाज आहे. आयुक्तांच्या नियंत्रणाखाली अतिरिक्त आयुक्त एक यांना मर्यादित अधिकार दिले आहेत. अभिलेख कक्ष, झोपडपट्टी व नियंत्रण, नागरवस्ती व विकास योजना विभाग, निवडणूक, पर्यावरण, जलनिस्सारण विभाग, स्थापत्य, उद्यान, माहिती व तंत्रज्ञानचे कामकाज सोपविले आहे. (प्रतिनिधी)
अतिरिक्त आयुक्तांचे वाढले अधिकार
By admin | Published: November 18, 2016 4:40 AM