मोशी : पिंपरी-चिंचवड शहरातील कुख्यात टोळ्या सध्या शांत असल्या, तरी कोवळ्या भाईगिरीला मात्र मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. वाहनांच्या तोडफोड प्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग अधिक असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या या कोवळ्यांवर अंकुश ठेवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.शहरात उदयास आलेल्या काही टोळ्यांचे अपवाद वगळता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच मोठ्या टोळ्या कार्यरत आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षांत गुन्हेगारीचे स्वरूप बदलते आहे. मिसरूड न फुटलेल्या अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरीची ‘क्रेझ’ मोठ्या प्रमाणात आहे. या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या मोटारी फोडून दहशत माजविण्याचा नवा ‘फंडा’ या गुन्हेगारी विश्वात येऊ लागला आहे. वाढत्या गुन्हेगारीचे मूळ ‘फेसबुक’च्या गैरवापरात आहे. अलीकडच्या काळात आऊटडोअर फोटोग्राफीचा नवा ट्रेंड आला आहे. गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकण्याआधी फेसबुकवर दहशत निर्माण करण्यासाठी असे एडिट केलेले फोटो वापरले जातात.हातात कोयता, तलवार, बनावट पिस्तूल घेऊन फोटो काढले जातात. व्हीलन लूक (खलनायकी बाज) येण्यासाठीचा मेकअपदेखील केला जातो. अशा फोटोखाली समाजात दहशत पसरेल असे फिल्मी डायलॉग टाईप करून बिनधास्त अपलोड केले जातात. मग सुरू होतो लाईक, कमेंटचा खेळ.ज्याला जितक्या लाइक अन् जितक्या अधिक कमेंट, तितकी त्याची लोकप्रियता अधिक असा सरळ अर्थ काढला जातो. यातूनच फेसबुकवर ग्रुप तयार होतात अन् त्या ग्रुपमधील वैर वाढत जाते. याकडे सायबर सेलचे लक्ष नाही. नवख्या गुन्हगारांचे रेकॉर्ड नसल्याने कारवाई करताना अनेक अडचणी येत आहेत, असे पोलीस अधिकारी उघडपणे सांगतात.
गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 3:10 AM